yuva MAharashtra काळ आला होता पण : बस विहिरीच्या कठड्यावर अडकल्याने टळली मोठी दुर्घटना

काळ आला होता पण : बस विहिरीच्या कठड्यावर अडकल्याने टळली मोठी दुर्घटना


| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - बुधवार दि. १८ जून २०२५

तासगाव तालुक्यातील येळावी येथे एसटी महामंडळाच्या प्रवासी बसला मोठा अपघात होण्याची शक्यता असताना सुदैवाने जीवितहानी टळली. ३१ प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या अगदी कठड्यावर अडकली आणि एक मोठा अनर्थ थोडक्यात टळला.

ही बस पुण्यातील वल्लभनगरहून तासगावच्या दिशेने निघाली होती. वाटेत येळावी गावाजवळ अचानक एक दुचाकीस्वार बसच्या समोर आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस अनियंत्रितपणे रस्त्याच्या खाली घसरत विहिरीच्या दिशेने सरकली.

वेग जास्त असल्यामुळे ब्रेक मारून थांबवणे कठीण झाले. मात्र नियतीने थोडी दया दाखवत मागील चाक रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत अडकल्यामुळे बस थेट विहिरीत कोसळली नाही. विहिरीच्या कठड्यावरच ती अडकली आणि प्रवाशांच्या जीवाला वाचवले.


या घटनेत बसचालकासह १७ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सगळ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती मिळाली आहे.

ही घटना घडताच प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली. क्षणभर त्यांना मृत्यूच्या दाढेत गेल्याची जाणीव झाली होती. बस विहिरीच्या पाण्याने भरलेल्या कठड्यावर थांबली नसती, तर ३१ जीवांचा अकाल अंत झाला असता. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि सर्वजण सुखरूप बचावले.