| सांगली समाचार वृत्त |
मिरज - बुधवार दि. १८ जून २०२५
मिरज येथील ख्यातीस पात्र असलेल्या सतार आणि तानपुरा या तंतूवाद्यांना केंद्र सरकारच्या वतीने भौगोलिक संकेत (GI - Geographical Indication) मानांकन प्राप्त झाले आहे. मुंबई येथे पार पडलेल्या विशेष समारंभात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते हे गौरवप्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
ही सन्मानचिन्हे मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर तसेच सोलट्युन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष मुबिन मिरजकर, अल्ताफ पिरजादे आणि सर्फराज शहापुरे यांनी स्वीकारली. या वेळी माजी मंत्री जयंत पाटील आणि राजेश टोपे यांचीही उपस्थिती होती.
दीडशे वर्षांची गौरवशाली परंपरा
मिरजमधील तंतूवाद्यनिर्मितीची परंपरा तब्बल १५० वर्षांहून अधिक कालखंडापासून अव्याहत सुरू आहे. याच परंपरेचा सन्मान करत, प्रथमच या वाद्यांना अधिकृत भौगोलिक ओळख प्राप्त झाली आहे. या मानांकनामुळे मिरजेत तयार होणाऱ्या वाद्यांची नक्कल करणे किंवा 'मिरज' या नावाचा अन्यत्र वापर करून विक्री करणे कायदेशीरदृष्ट्या प्रतिबंधित होणार आहे.
निर्यातीस आणि दर्जेदार ओळखीला चालना
या GI मानांकनामुळे मिरजेतील वाद्यांना देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी ओळख मिळेल. स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या वाद्यांना आता निर्यातीसाठी नवे दालन खुले झाले असून, त्यांना दर्जेदार व ब्रँडेड ओळख प्राप्त होणार आहे.
तीन वर्षांच्या सततच्या प्रयत्नांना यश
या मानांकनासाठी मागील तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. दोनशे वर्षांच्या परंपरेची ऐतिहासिक कागदपत्रे, पुरावे व दस्तऐवज यांची सखोल पडताळणी झाल्यानंतर हे GI मानांकन मंजूर झाले. यानंतर इतरही वाद्यांना GI साठी मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ वाद्यनिर्माते बाळासाहेब मिरजकर यांनी दिली.