| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. १८ जून २०२५
सांगली महापालिका हद्दीतील फेरीवाले, भाजीपाला व फळविक्रेते यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार वाद निर्माण झाला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांना प्रश्नांच्या घेऱ्यात घेत ‘गरीबांवर कारवाई का, मोठ्या लोकांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष का?’ असा मुद्दा उपस्थित करत संतप्त भूमिका मांडली. वातावरण तापत चालले असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकला.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महापालिकेने अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेवर आमदार पडळकरांनी जोरदार आक्षेप घेतला. “फेरीवाल्यांसाठी अद्याप ठोस धोरण नाही. त्यांच्यासाठी झोन ठरलेले नाहीत. व्यवसाय कुठे करावा हे न सांगता सरळ गाड्या फोडल्या जात आहेत. सणांचा हंगाम आणि पावसाळा सुरू असताना अशा कठोर कारवाया अन्यायकारक आहेत,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यावर प्रत्युत्तर देताना आयुक्त सत्यम गांधी यांनी, “ज्यांचे अतिक्रमण आहे त्यावर कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. प्रशासनाच्या कामात अडथळा आणल्यास वाहनांच्या नुकसानीस आम्ही जबाबदार ठरणार नाही,” असे ठाम मत मांडले.
या मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. आमदार पडळकर यांनी “गरिबांना आधी योग्य जागा द्या, सोयीसुविधा पुरवा आणि त्यानंतर अतिक्रमणाविरोधात कारवाई करा. अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल,” असा थेट इशाराही दिला.
या घडामोडीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, “बैठकीतील वातावरण एवढं ताणलं गेलं होतं की फक्त हातघाई बाकी होती. आमदार पडळकर अभ्यासू आहेत, त्यांच्याकडे मुद्दे आणि पुरावे असतात, मात्र त्यांची आक्रमकता थोडी कमी झाली पाहिजे,” अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.