yuva MAharashtra आर्थिक देवघेवीच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक; संशयित पसार

आर्थिक देवघेवीच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक; संशयित पसार


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. १९ जून २०२५

आर्थिक देवघेवीच्या बहाण्याने ५० लाख रुपये आणि एक मोटार वाहन हडपल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणधीर राजेंद्र भोसले (रा. दुधाळवस्ती, जत) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, तो सध्या फरार आहे.

सागर बाळासाहेब पवार (वय ३४, रा. चिंतामणीनगर, ताराबाई पार्क, सांगली) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांचा टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स व्यवसाय असून, त्यातून त्यांची ओळख भोसले याच्याशी झाली होती.

भोसले याने स्वतःचे दागिन्यांचे दुकान असल्याचे सांगत विश्‍वास संपादन केला. दोघांमध्ये वेळोवेळी पैशांची देवघेव सुरू होती. दरम्यान, २०२३ मध्ये भोसले याने पवार यांच्याकडून ५० लाख रुपयांची रोकड आणि "एमएच १२ एनएफ ३६९" क्रमांकाची मोटार उचलून घेतली.


पवार यांनी अनेक वेळा रक्कम व मोटार परत करण्याची मागणी केली. मात्र, भोसलेने ती टाळली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे.