yuva MAharashtra अंकली परिसरातील कार शोरूममध्ये मध्यरात्री धाडसी चोरी; सुमारे ९.५९ लाखांची रोकड लंपास

अंकली परिसरातील कार शोरूममध्ये मध्यरात्री धाडसी चोरी; सुमारे ९.५९ लाखांची रोकड लंपास


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १३ जून २०२५ 

सांगली – सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अंकली गावाच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी एक धाडसी कारस्थान रचत माय हुंडाई या चारचाकी शोरूमला लक्ष्य केलं. सुमारे दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी तब्बल ९ लाख ५९ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सहा ते सात चोरटे या गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चोरी दरम्यान सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करण्यात आली. चोरट्यांनी शोरूममधील तिजोरी चक्क उचलून नेली आणि ती शेजारील शेतामध्ये नेऊन कटरच्या सहाय्याने उघडली. संपूर्ण कारवाया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झाल्याचे निदर्शनास आले आहे.

घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी पहाटेच घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दिशा दिल्या आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, चोरटे शोरूमच्या मागच्या बाजूने आत शिरले. तिघे चोरटे दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून आत गेले आणि त्यांनी इतर साथिदारांना आत प्रवेश दिला. अकौंटटच्या केबिनमधील तिजोरी कटर, हत्यारे आणि मारतुडाच्या सहाय्याने उचलून बाहेर काढण्यात आली.

घटनेच्या वेळी तिघे सुरक्षा रक्षक ड्युटीवर होते, मात्र चोरट्यांच्या चतुराईमुळे त्यांना सुरुवातीला काही समजले नाही. तिजोरी बाहेर नेत असताना रक्षकांनी चोरट्यांना पाहिले आणि अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी दगडफेक करून प्रतिकार केला आणि तिजोरी उचलून घेऊन शेतामध्ये पलायन केले.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून, लवकरच या गुन्ह्याचा छडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.