| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १७ जून २०२५
जयश्रीताई पाटलांनी भाजपासोबत घेतलेला निर्णय ही अनैसर्गिक युती होईल, अशा शब्दात, खासदार विशाल पाटलांनी टीका केली आहे, तसेच जयश्रीताई पाटील यांचा निर्णय लोक स्वीकारणार नाहीत, त्यांनी काँग्रेसच्या विचाराधाराच्या उलट जाऊ नये, अशी आमच्या कुटुंबाची इच्छा आहे, पण त्यांनी कुठल्या दबावातून हा निर्णय घेतला आहे, हे त्यांच्याशी बोलल्यावरचं कळेल, मात्र त्यांनी भाजपा सोबत जाऊ नये, याबाबत बोलणार असल्याचंही विशाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
माजी मुख्यमंत्री तथा कॉँग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या नात सून यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला असून बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या हा पक्षप्रवेश होणार आहे. याबाबत खासदार. विशाल पाटील यांना प्रश्न विचारल्यानंतर वरीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना देखील भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. यावर खासदार विशाल पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.
जयश्रीताई पाटील यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाने कॉंग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार हे निश्चित. त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र तरीही कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा वा राज्य पातळीवरील नेत्यांकडून जयश्रीताई पाटील यांच्या भाजपा प्रवेश रोखण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.