| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १७ जून २०२५
कर्नाटकातील अलमट्टी धरण जून महिन्यात केवळ ४७ टक्के भरावे, असा स्पष्ट नियम केंद्रीय जलआयोगाने घालून दिला आहे. मात्र, जलआयोगाच्या या नियमानुसार पाणीसाठा न राखता धरणात ५२ टक्क्यांपर्यंत साठवणूक करण्यात आल्याने कृष्णा खोऱ्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
१२३ टीएमसी इतकी पूर्ण क्षमतेची साठवणूक करणाऱ्या अलमट्टी धरणामध्ये १५ जून रोजी तब्बल ६४.०३ टीएमसी म्हणजेच ५२ टक्के पाणी साठवण्यात आले होते. प्रत्यक्ष नियमानुसार या कालावधीत ५७ टीएमसी (५१३.६० मीटर) म्हणजे ४७ टक्केच पाणीसाठा असायला हवा होता. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष करत अधिक पाणीसाठा ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, कोल्हापूर, सांगली व सातारा परिसरात पावसाचा जोर सध्या कमी आहे. पण येत्या आठवड्यात मान्सूनचा प्रभाव वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा वेळी अलमट्टी धरणात आधीच जास्त पाणी साठवले गेले असल्यामुळे संभाव्य पूरस्थितीची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
धरणात सध्या २३,२३० क्युसेक पाण्याची आवक असून केवळ १०,००० क्युसेक पाणी विसर्ग केला जात आहे. अशा परिस्थितीत उर्वरित पावसाळ्यात वाढणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत शंका व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत – चंद्रशेखर पाटोळे
अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याबाबत आमचा कर्नाटक सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, ४७ टक्क्यांपेक्षा जास्त साठवले गेले आहे याची कल्पना कर्नाटकच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असून लवकरच पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल, असा विश्वास आहे.
जलआयोगाच्या नियमांकडे दुर्लक्ष
कृष्णा महापूर नियंत्रण समितीचा आक्षेप
केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कर्नाटक सरकारवर कारवाई व्हावी, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल करावी, तसेच आम्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केंद्रीय जलआयोगाकडेही तक्रार सादर करणार आहोत.