yuva MAharashtra जैन महिला परिषदेच्या वतीने महिला उद्योजिका मेळावा आणि गुणगौरव सोहळा

जैन महिला परिषदेच्या वतीने महिला उद्योजिका मेळावा आणि गुणगौरव सोहळा


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनि दि. १४ जून २०२५ 

दक्षिण भारत जैन सभेच्या जैन महिला परिषदेच्या वतीने महिलांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम – महिला उद्योजिका मेळावा व गुणगौरव सोहळा २०२५ – येत्या रविवार, १५ जून रोजी आयोजित करण्यात येत आहे. हा भव्य कार्यक्रम आचार्यश्री आदिसागर सांस्कृतिक भवन, अंकली (ता. मिरज) येथे संपन्न होणार आहे.

या विशेष प्रसंगी 'जैन नेक्स्ट ॲप'च्या महिला विंगचा औपचारिक शुभारंभ होणार असून, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येईल.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र विरेंद्र पाटील भूषवणार आहेत, तर गौरव सोहळ्याच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती मिनाक्षी रावसाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात उद्योजिका सौ. अश्विनी दानीगोंड, सांगली जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सौ. विद्या कुलकर्णी, आणि उद्योजिका सौ. नीता पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

'जैन नेक्स्ट' ॲप हे जैन समाजाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र आणणारे एक महत्त्वाकांक्षी माध्यम असून, महिलांसाठी व्यवसाय वृद्धी, संपर्क विस्तार, उद्योजकतेचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ आहे.

जैन महिला परिषद ही संस्था गेली १२६ वर्षे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने – शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि आरोग्य क्षेत्रात – सातत्याने कार्यरत आहे.


या सोहळ्यात सौ. सुरेखा दुग्गे (मुंबई), सौ. आशा पाटील (ठाणे), डॉ. सरिता कोठाडिया (सोलापूर), सौ. अश्विनी गाडवे (वेगळौट), डॉ. संगीता शहा (बारामती), डॉ. विजया बुद्रुक (पुणे) आणि सौ. सुजाता पाटील (नांदणी) यांचा त्यांच्या क्षेत्रातील कार्यासाठी गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास रावसाहेब जि. पाटील, दत्ता डोर्ले, डॉ. अजित पाटील, संजय शेटे, अरविंद मजलेकर, कमल मिणचे, विजयाताई पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वरुपा पाटील (यड्रावकर) – चेअरमन, सौ. अंजली कोले – व्हा. चेअरमन, सौ. अनिता पाटील – सेक्रेटरी, सौ. गीतांजली उपाध्ये – जॉइंट सेक्रेटरी आणि परिषदेच्या सदस्यांच्या वतीने समाजबांधवांना या प्रेरणादायी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.