| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. १४ जून २०२५
सांगलीतील प्रादेशिक परिवहन कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सुषमा रेपे यांनी दक्षिण आफ्रिकेतील अत्यंत खडतर आणि प्रतिष्ठेच्या 'कॉम्रेड मॅरेथॉन'मध्ये यशस्वी कामगिरी करत देशाचे नाव उज्वल केले आहे. तब्बल ९० किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन त्यांनी ११ तास २२ मिनिटांत पूर्ण केली.
जगातील सर्वांत जुन्या आणि आव्हानात्मक अल्ट्रामॅरेथॉनपैकी एक म्हणून ओळखली जाणारी ही शर्यत डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग या डोंगराळ मार्गावर दरवर्षी आयोजित केली जाते. १९२१ पासून सुरू असलेल्या या स्पर्धेला ‘मानवी क्षमतेची अंतिम परीक्षा’ असेही म्हटले जाते.
कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी भारतातील खेळाडूंना दोन ४२ किमी मॅरेथॉन ४ तास ४० मिनिटांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असते. मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड येथील आणि सध्या सांगलीमध्ये कार्यरत असलेल्या सुषमा यांनी ही अट पूर्ण करत ४ तास ३० मिनिटांत दोन मॅरेथॉन पूर्ण केल्या आणि कॉम्रेडमध्ये सहभागाची पात्रता मिळवली.
या यशामागे तीन वर्षांची सातत्यपूर्ण मेहनत आणि न थांबणारी जिद्द आहे. दररोज शिस्तबद्ध सराव आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. ‘अर्हता ग्रुप’ कोल्हापूर येथील प्रशिक्षक आशिष आणि पंकज रावळू यांचे मार्गदर्शन तसेच सांगलीतील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आणि निरीक्षक अमित गुरव यांचे प्रोत्साहनही त्यांच्या पाठीशी होते. सुषमा रेपे यांचा हा पराक्रम अनेक महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, हे निश्चित!