yuva MAharashtra जगप्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा निर्णय : मुलाला न देता 4000 कोटींची संपत्ती केली शिक्षणासाठी दान

जगप्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा निर्णय : मुलाला न देता 4000 कोटींची संपत्ती केली शिक्षणासाठी दान



| सांगली समाचार वृत्त |
बीजिंग - शनि दि. १४ जून २०२५ 

अ‍ॅक्शन विश्वातील आंतरराष्ट्रीय सुपरस्टार जॅकी चॅन यानं आपल्या आयुष्याचा एक मोठा निर्णय घेत, तब्बल 4000 कोटींची संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान केली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण रक्कम त्यानं आपल्या मुलाला न देता गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिली आहे.

एका जुन्या मुलाखतीत जॅकी चॅननं यासंदर्भात स्पष्ट मत व्यक्त करत सांगितलं की, “माझा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहण्याइतका सक्षम आहे. जर तो खरोखरच यशस्वी होऊ शकत असेल, तर त्याला माझ्या संपत्तीची गरज भासणार नाही. आणि जर त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता आलं नाही, तर तो ही संपत्ती वाया घालवेल.”


जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर 90 च्या दशकात अधिराज्य गाजवणाऱ्या जॅकी चॅननं बालवयातच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. ब्रूस लीच्या चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून सुरुवात केलेल्या जॅकीनं पुढे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत चीनमधून थेट हॉलिवूडपर्यंतचा प्रवास यशस्वी केला. त्याच्या अनोख्या अ‍ॅक्शन स्टाईल आणि विनोदी अभिनयासाठी तो आजही ओळखला जातो.

शिक्षणाची गरज आणि गरिब विद्यार्थ्यांचे भविष्य या गोष्टी जॅकी चॅनला कायमच जवळच्या वाटल्या आहेत. त्यामुळेच ही संपत्ती समाजाच्या उपयोगासाठी दान करण्याचा निर्णय त्यानं घेतला. यासंदर्भात जरी कोणतीही अलीकडची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी काही वर्षांपूर्वी त्यानं आपल्या मनातील विचार जगासमोर मांडले होते.