| सांगली समाचार वृत्त |
तेहरान - सोमवार दि. २३ जून २०२५
मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्ष चिघळत चालला असतानाच अमेरिकेने थेट हस्तक्षेप करत इराणवर जबरदस्त हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर विमानातून इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या महत्त्वाच्या अणुसंवर्धन केंद्रांवर निशाणा साधण्यात आला. हे केंद्र भुईखाली लपवलेले असून त्यावर तब्बल सहा बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.
या घडामोडीनंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला झाल्याची टीका करत इराणने सूड घेण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर इराण आता आपले सर्वात घातक क्षेपणास्त्र – ‘खोरमशहर’ – बाहेर काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खोरमशहर: इराणचा हुकमी एक्का
इराणने आतापर्यंत गदर, इमाद आणि खेबर शकन सारख्या क्षेपणास्त्रांचा वापर करून इस्रायलवर जोरदार हल्ले केले होते. विशेषतः खेबर शकन हे प्रचंड वेगाने लक्ष्य भेदणारे क्षेपणास्त्र असून, त्याचा प्रभाव तेल अवीव, जेरुसलेम व बीअर शेवा या शहरांवर दिसून आला.
मात्र आता परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. ‘खोरमशहर’ हे इराणचे सर्वात प्रबळ व धोकादायक क्षेपणास्त्र असून, 1500 किलो वॉरहेड तब्बल 2000 किलोमीटर अंतरावर नेण्याची त्याची क्षमता आहे. आतापर्यंत या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आलेला नाही, पण अमेरिकी हल्ल्यांनंतर ते युद्धात उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत जग ?
अमेरिकेच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपानंतर या संघर्षाचे रूपांतर आंतरराष्ट्रीय युद्धात होण्याची शक्यता आहे. इराणने स्पष्टपणे म्हटले आहे की, कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे पुढील काही तास हेच ठरवतील की, युद्ध आता कोणत्या टप्प्याकडे वाटचाल करणार आहे.