yuva MAharashtra मिरज कॉर्ड लाईनसाठी १२८.७८ कोटींचा मंजूर निधी – खासदार विशालदादा पाटील यांचे प्रयत्न फलद्रूप

मिरज कॉर्ड लाईनसाठी १२८.७८ कोटींचा मंजूर निधी – खासदार विशालदादा पाटील यांचे प्रयत्न फलद्रूप


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ५ जून २०२५

मध्य रेल्वे अंतर्गत मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने १२८.७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या निर्णयामुळे रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमतेला नवसंजीवनी मिळणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने हा महत्वपूर्ण टप्पा पार पडला आहे.

या प्रकल्पासंदर्भात खासदार विशालदादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी सातत्याने पत्रव्यवहार करून विविध सूचना मांडल्या होत्या. त्यामध्ये चार मुख्य मागण्या होत्या, ज्यापैकी दोन कामांना गती मिळाली आहे. विशेषतः मिरज ते कोल्हापूर रेल्वे दुहेरीकरणासाठी डी.पी.आर. (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यासाठी आवश्यक लोकेशन सर्व्हे लवकरच पार पडणार असल्याचे संकेत आहेत.


खासदार पाटील यांनी याबाबत केंद्रीय मंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, मिरज जंक्शन हे पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचे सांगितले आहे. कॉर्ड लाईनमुळे येथे धावणाऱ्या गाड्यांचा वेग वाढेल आणि जंक्शनच्या क्षमतेत लक्षणीय सुधारणा होईल. परिणामी, मिरज हे गतिमान रेल्वे स्थानक म्हणून नावारूपास येईल आणि महत्त्वाचा इंटरचेंज पॉईंट म्हणून उदयास येईल.

याशिवाय, नवीन रेल्वे गाड्या, थांबे, पूल आणि विविध सुधारणा कामांसाठीही खासदार पाटील यांनी रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधत पत्रव्यवहार केला असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.