yuva MAharashtra जयश्रीताईंच्या निर्णयास पूर्ण पाठिंबा; कार्यकर्त्यांची बैठकीत एकमुखी संमती

जयश्रीताईंच्या निर्णयास पूर्ण पाठिंबा; कार्यकर्त्यांची बैठकीत एकमुखी संमती


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ५ जून २०२५

ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील कोणताही निर्णय घेतील, तो आम्ही संपूर्णपणे स्वीकारू, असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी व्यक्त केला. कळंबी येथील त्यांच्या फार्महाऊसवर आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

अलीकडील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिल्यामुळे जयश्रीताई पाटील यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

दिवंगत नेते मदन पाटील यांचे निष्ठावान सहकारी आणि अनेक कार्यकर्ते जयश्रीताईंनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंवा भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, अशी मागणी करत आहेत. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज कळंबी येथे जयश्रीताईंनी कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला. बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी जयश्रीताईंना पुढील निर्णय घेण्याचे सर्वस्वी स्वातंत्र्य देण्याचे ठरवले आणि त्यांचा कोणताही निर्णय मान्य असेल, अशी ग्वाही दिली.


दरम्यान, काँग्रेसचे माजी मंत्री व सांगलीतील युवा नेते विश्वजित कदम हे जयश्रीताईंवरील कारवाई मागे घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्या काँग्रेसमध्येच राहाव्यात यासाठी आग्रही आहेत. मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीत बोलताना जयश्रीताईंनी, “कार्यकर्त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मी लवकरच योग्य निर्णय घेईन. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपले नाते भविष्यातही घट्ट राहील,” असे आवाहन केले. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिका निवडणुका कार्यकर्त्यांच्या बळावर लढवू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.