| सांगली समाचार वृत्त |
मिरज - शनिवार दि. १४ जून २०२५
मिरज तालुक्यातील बेडग-मंगसुळी रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सिनेमातील थराराला साजेशी घटना घडली. दोन अज्ञात चारचाकी वाहनांनी पाठलाग करत एक पिकअप थांबवली आणि कोयत्याचा धाक दाखवून दोन व्यापाऱ्यांकडील तब्बल सात लाखांची रोख रक्कम लुटून लुटारू पसार झाले.
लक्ष्मण कदम (वय २९) आणि विकास शंकरराव सोनटक्के (वय ३५, दोघेही मूळ रा. मुळशी, पुणे) हे दोघे व्यापारी पुण्यातून विजापूरकडे किराणा माल खरेदीसाठी निघाले होते. त्यांच्या गाडीकडे दोन अनोळखी चारचाकी वाहनांनी पाठलाग करत बेडग-मंगसुळी रस्त्यालगत पिकअपला अडवले. त्यानंतर लुटारूंनी कोयत्याने गाडीच्या काचेवर हल्ला करत व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली.
घाबरलेल्या व्यापाऱ्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावून जीव वाचवण्यासाठी पळ काढला. लुटारूंनी त्यानंतर पिकअपमधील सात लाख रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली आणि दोन्ही गाड्यांमधून पळ काढला. ही धक्कादायक घटना पहाटे चारच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या संपूर्ण सांगली जिल्हा पोलीस यंत्रणा लुटारूंचा माग काढत असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
या सिनेस्टाईल लुटीने ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून अशा प्रकारांपासून सुरक्षितता ही नव्याने चर्चेचा विषय ठरली आहे.