yuva MAharashtra कुपवाडजवळ दारूची मोठी तस्करी उधळली; आटपाडीच्या दोन जणांना अटक

कुपवाडजवळ दारूची मोठी तस्करी उधळली; आटपाडीच्या दोन जणांना अटक


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. २२ जून २०२५

कुपवाड परिसरात बेकायदेशीररीत्या विदेशी दारूची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अडवून मोठा साठा हस्तगत केला. या कारवाईत तब्बल ११.७९ लाख रुपयांची विदेशी दारू आणि सुमारे पाच लाखांचा टेम्पो, असा एकूण १६.७९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आटपाडी तालुक्यातील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

गुन्हे अन्वेषण पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अक्षय प्रदीप वाघमारे (वय २०, रा. मुलाणकी वस्ती, आटपाडी) हा टेम्पो (MH 10 DT 7205) मधून विदेशी दारूसाठा घेऊन कुपवाडमार्गे पुढे जाणार असल्याचे समजले. पथकाने तातडीने कुपवाडजवळील तासगाव फाटा आणि कुमठे फाटा परिसरात सापळा रचून वाहनांची तपासणी सुरू केली. त्यावेळी पांढऱ्या रंगाचा संशयित टेम्पो आल्यानंतर त्यास थांबवून झडती घेतली असता, मागील भागात विदेशी दारू व बीअरच्या पेट्या आढळून आल्या.


या प्रकरणात चालक अक्षय वाघमारे आणि त्याच्यासोबत असलेले नानासाहेब आनंदा पाटील (वय ५१, रा. पाटील मळा, आटपाडी) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांकडे संबंधित दारूसाठ्याचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान त्यांनी माल मिरज येथील संगम वाइन शॉपमधून घेतल्याची कबुली दिली. दारू आटपाडी परिसरात बेकायदेशीर विक्रीसाठी नेली जात होती.

या धाडीत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, अनिल ऐनापुरे, अतुल माने, रणजित जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. दोन्ही आरोपी आणि मुद्देमाल कुपवाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. दारू पुरवणाऱ्या वाइन शॉपच्या मालकावरही चौकशी होणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.