yuva MAharashtra मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग दहा पदरी होणार, प्रवास अधिक वेगवान होणार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग दहा पदरी होणार, प्रवास अधिक वेगवान होणार


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - रविवार दि. ९ जून २०२५ 

मुंबई-पुणे प्रवास आणखी जलद आणि सुलभ होणार आहे. सध्या सहा पदरी असलेला हा महामार्ग आता दहा पदरी करण्याचे नियोजन करण्यात आले असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजे १४,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

याआधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) महामार्गावर वाढत्या वाहतुकीच्या दृष्टीने आठ पदरीकरणाचा प्रस्ताव तयार करून सरकारकडे सादर केला होता. मात्र आता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून थेट दहा पदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या १० दिवसांत राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.

वाहतुकीचा बूस्टर डोस

मुंबई – पुणे दरम्यान ९४.५ किमी लांबीचा हा द्रुतगती महामार्ग २००२ साली पूर्ण झाला. सुरुवातीला या महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ अडीच तासांत पार करता येऊ लागले. मात्र सध्या दररोज ६५ हजारहून अधिक वाहने या मार्गावरून प्रवास करतात, गर्दीच्या वेळी ही संख्या १ लाखापर्यंत पोहोचते. परिणामी सहा पदरी रचना अपुरी ठरत आहे.

दुप्पट मार्गिका, दुप्पट सुविधा

पूर्वी दोन बाजूंनी प्रत्येकी एक मार्गिका वाढवण्याचा प्रस्ताव होता, मात्र आता प्रत्येकी दोन मार्गिका वाढवण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी आवश्यक जागा उपलब्ध असून फक्त बोगद्यांसाठी थोडेसे भूसंपादन करावे लागणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.


प्रकल्पासाठी निधी कसा उभारणार ?

या प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी दोन पर्याय प्रस्तावित आहेत:

1. टोल वसुलीचा कालावधी वाढवणे

2. राज्य सरकारकडून अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी उपलब्ध करून घेणे.

राज्य सरकारने यापैकी कोणताही एक पर्याय निवडला, तर प्रकल्पाला त्वरित गती मिळणार आहे.

नव्या दहा पदरी द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास केवळ जलदच नव्हे तर अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल, असे चित्र आता स्पष्ट होत आहे.