| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - रविवार दि. ९ जून २०२५
राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाऊर्जाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, "महाऊर्जाच्या माध्यमातून राज्यात सौर ऊर्जा क्रांतीचा नवा अध्याय लिहिला जात आहे. सर्व शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर आणण्यासाठी विशेष गती देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजना प्रभावीपणे राबवत, राज्यातील युनिटनिहाय ग्राहकांना टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जेशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे."
पहिल्या टप्प्यात १०० युनिटपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांचे संपूर्ण बील शून्यावर आणण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हरित ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची घोडदौड
महाऊर्जाची नवी इमारत ही 'हरित इमारती'चे उत्तम उदाहरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. ती ऊर्जा बचत करणारी, पर्यावरणपूरक आणि संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारी इमारत आहे.
राज्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली असून, गेल्या दोन वर्षांत देशभर बसवण्यात आलेल्या ४ लाख कृषी पंपांच्या तुलनेत महाराष्ट्राने ५ लाख सौर कृषी पंपांची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून १६ हजार मेगावॅट क्षमतेचे फिडर २०२६ पर्यंत सौर ऊर्जेवर रूपांतरित केले जाणार आहेत.
ऊर्जेच्या दरात संभाव्य घट
मुख्यमंत्री म्हणाले की, "गेल्या दोन दशकांमध्ये दरवर्षी सरासरी ९ टक्के दरवाढ झाली. मात्र, २०२५ नंतर दरवर्षी वीज दर कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सौर, पवन व हायड्रोजन यांसारख्या अपारंपरिक स्रोतांवर भर दिला जात आहे."
बोरियम करार व भविष्यातील ऊर्जा दिशा
रशियातील सरकारी संस्थेसोबत बोरियमवर आधारित ऊर्जा निर्मितीचा करार हा भारताच्या ऊर्जाक्षेत्रासाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. २०३० पर्यंत ५०% वीज अपारंपरिक स्रोतांतून निर्माण करण्याचे स्वप्न साकार होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्रात हा आकडा ५२% पर्यंत नेण्यात येणार आहे.
महाऊर्जाची नव्या युगाची वास्तू
औंध येथील महाऊर्जाची नवी प्रशासकीय इमारत ही पर्यावरणपूरक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. या इमारतीत अत्याधुनिक शीतकरण व्यवस्था, सौर ऊर्जा संयंत्र, वायुवीजन प्रणाली, रेडियंट कुलिंग, वायुप्रवाह नियंत्रक प्रणाली इत्यादींचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री आणि मान्यवरांनी वृक्षारोपण करून हरित ऊर्जा मोहिमेस सुरुवात केली. तसेच, महाऊर्जाच्या प्रगती अहवालाचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले.