yuva MAharashtra लोकल दुर्घटनांवर लगाम घालण्यासाठी सरकार सज्ज; कार्यालयीन वेळेत बदल आणि सर्व लोकल एसी करण्याचा प्रस्ताव

लोकल दुर्घटनांवर लगाम घालण्यासाठी सरकार सज्ज; कार्यालयीन वेळेत बदल आणि सर्व लोकल एसी करण्याचा प्रस्ताव


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. ११ जून २०२५

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी (9 जून 2025) घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण मुंबई हादरली. धावत्या लोकलमधून प्रवासी खाली पडल्यामुळे चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने निर्णय घेण्यात आले असून, लोकलच्या दरवाज्यांवर बंद यंत्रणा बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासोबतच गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून अधिक महत्त्वाचे निर्णय घेण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, "ही घटना अत्यंत चिंताजनक असून, लोकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे."


फडणवीस पुढे म्हणाले की, "काल केंद्रिय रेल्वेमंत्रींसोबत जवळपास तासभर चर्चा झाली. त्यांनी सध्याच्या अडचणी स्पष्ट केल्या आणि संभाव्य उपाययोजनांवर मार्गदर्शनही केले." या अनुषंगाने, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत लवकरच बदल करण्यात येणार असून, सर्व लोकल गाड्या एसी करण्याचा प्रस्ताव देखील विचाराधीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.