| सांगली समाचार वृत्त |
पुणे - बुधवार दि. ११ जून २०२५
जे वय खेळण्याचं असतं, त्या वयात राजवर्धिनीने कळसुबाई शिखर गाठत आभाळालाही गवसणी घातली. वय होतं केवळ 1 वर्ष 11 महिने 15 दिवस. महाराष्ट्राच्या सर्वोच्च कळसुबाई शिखरावर पाऊल ठेवणारी ती देशातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा हे मूळ गाव आणि सध्या पुणे निवासी असलेल्या राजवर्धिनी प्रसाद चव्हाण हिची ही अचाट कामगिरी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये दोन वेळा नोंदवली गेली आहे. तिच्या शौर्याचा शिखरावरच नाही, तर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातही ठसा उमटला आहे. कळसुबाई, जी महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’ म्हणून ओळखली जाते, हे शिखर सर करणे अनेक अनुभवी ट्रेकरांसाठीही एक आव्हानच असते.
राजवर्धिनीचा गिर्यारोहणाचा प्रवास 24 ऑक्टोबर 2024 रोजी सिंहगड ट्रेकने सुरू झाला. तेव्हा तिचं वय होतं केवळ 1 वर्ष 7 महिने 5 दिवस. कडेवर नेलेलं बाळ स्वतः चालत खाली आलं आणि संपूर्ण किल्ला पायी सर करत कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का दिला. आजपर्यंत तिने सिंहगड, शिवनेरी, रायगड, केंजळगड, रायरेश्वर, भूषणगड, मल्हारगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड हे नऊ ऐतिहासिक किल्ले सर केले आहेत.
शौर्याची प्रेरणा - कुटुंबाची साथ
राजवर्धिनीच्या या प्रेरणादायी प्रवासामागे तिचे वडील प्रसाद चव्हाण आणि आई अमिता यांची निस्सीम साथ आहे. प्रसाद चव्हाण हे स्वतः अनुभवी ट्रेकर असून, त्यांनी 400 पेक्षा जास्त ट्रेक्स पूर्ण केले आहेत. पुण्याहून रायगडापर्यंतची पायपीट, सिंहगड, राजगड, तोरणा आणि लिंगाणा अशा किल्ल्यांची मालिका त्यांनी गाठली आहे. राजवर्धिनीच्या दहाव्या महिन्यातच तिला रायगडावर शिवरायांच्या समाधीस्थळी नेलं गेलं. तिच्या हातांना लागलेली पहिली माती, तीही स्वराज्य स्थापकांच्या पवित्र भूमीची!
राज्यस्तरीय गौरव आणि शाबासकी
राजवर्धिनीच्या या ऐतिहासिक यशाला अनेक मान्यवरांचा अभिवादन लाभलं आहे. छत्रपती उदयनराजे भोसले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तिच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. हिंदवी स्वराज्य संकल्प दिनाच्या दिवशी रायरेश्वर येथे पार पडलेल्या विशेष सोहळ्यात, अभिषेकाचा यजमान होण्याचा मान देखील या चिमुकल्या साहसी मुलीला मिळाला होता.