| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. २४ जून २०२५
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून एक महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी ३१ जुलैपर्यंत अलमट्टी धरणात ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा करू नये, अशी सूचना केली आहे. तसेच, धरणाची उंची वाढवू नये, कारण त्यामुळे महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती उद्भवू शकते, असे त्यांनी नमूद केले.
पाटकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, धरणाच्या सध्याच्या उंचीचा आणि वाढत्या पाणीसाठ्याचा महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होत आहे. केंद्रीय जल आयोगाने ठरवलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. धरण ३१ जुलैपर्यंत अर्धवट भरलेले असावे आणि हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे संपूर्ण पावसाळ्यात खुले ठेवावेत, अशी त्यांनी मागणी केली आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ३०० हून अधिक गावे आणि काही शहरी भाग दरवर्षी पुराच्या धोक्यात येतात. त्यामुळे अलमट्टी धरणातील पाणीसाठा मर्यादित ठेवणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र शासनानेही धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे. यासोबतच २००५ पासून कृष्णा खोऱ्यातील नागरिकांनीही उंची वाढीला तीव्र विरोध केला असून, त्यांचे पुनर्वसन आणि भरपाई अद्यापही अपूर्ण आहे.
हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप अनिश्चित झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १५ सप्टेंबरपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने न भरणे आणि याआधीही सतत विसर्ग सुरू ठेवणे आवश्यक आहे, असे पाटकर यांनी स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर, पूरपाणी दुसऱ्या नदीच्या खोऱ्यात वळवण्याची राज्य सरकारची योजनाही त्यांनी अयोग्य ठरवली. ही कृती पर्यावरणाच्या दृष्टीने चुकीची असून, कृष्णा नदी जलन्यायाधिकरणाच्या निर्णयाचे उल्लंघन करणारी आहे, असे त्यांनी सांगितले.