| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. २४ जून २०२५
सांगलीत पोलिस ठाण्याच्या बाहेर तडजोडीच्या माध्यमातून प्रकरणे मिटवण्याच्या घटनांची माहिती समोर येताच, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी यावर थेट शब्दात नाराजी व्यक्त केली. "खाकीवर डाग लागू नये, लोकांचा विश्वास डळमळू नये, म्हणून अशा तडजोडीखोर प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही," असा सज्जड इशारा त्यांनी गुन्हे आढावा बैठकीत दिला.
फुलारी सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील पोलिस दलाच्या कामकाजाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. बैठकीस पोलिस अधीक्षक संदीप घुगे, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेळेत नोंदवून आरोपींना तत्काळ अटक झाली पाहिजे आणि दोषारोपपत्र वेळेवर न्यायालयात दाखल व्हावं. गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासात फॉरेन्सिक व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, असेही त्यांनी नमूद केले.
अवैध शस्त्रसाठ्यावर कडक कारवाईची गरज
बेकायदा अग्नीशस्त्र प्रकरणांकडेही त्यांनी विशेष लक्ष वेधले. “सांगली पोलिसांनी काही कारवाया केल्या आहेत, मात्र केवळ वरची पातळी पुरेशी नाही. शस्त्र तस्करांच्या मुळांपर्यंत पोहोचून त्यांचा नेटवर्क उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
शांतता वारीसाठी सुरक्षेची सज्जता हवी
आगामी सण-उत्सव व वारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शांतता कमिट्यांच्या बैठकी आयोजित करून नियोजनबद्ध सुरक्षेचे आदेश दिले. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी वाहतूक शाखा आणि आरटीओ विभागानेही सक्रिय भूमिका घ्यावी, असे त्यांनी सुचवले.
तक्रारी दाबल्या, चौकशी सुरू
मिरज ग्रामीण हद्दीत एका लुटीच्या घटनेत पोलिसांनी तडजोड करत तक्रार नोंदवण्याऐवजी थेट परस्पर रक्कम परत केली. यामुळे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी याची चौकशी सुरू केली आहे. दोषींवर कारवाई निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वृक्षसंवर्धनासाठीही पोलिसांचा पुढाकार
पोलिस दल सामाजिक बांधिलकी जपत आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत सांगली पोलिस मुख्यालयातही वृक्षारोपण करण्यात आले, अशी माहिती श्री. फुलारी यांनी दिली.