yuva MAharashtra "शेतकऱ्यांसाठी खिसा रिकामा, उद्योजक, बुलेट ट्रेनसाठी कोट्यवधींचा खुर्दा" - राजू शेट्टी

"शेतकऱ्यांसाठी खिसा रिकामा, उद्योजक, बुलेट ट्रेनसाठी कोट्यवधींचा खुर्दा" - राजू शेट्टी

फोटो सौजन्य : फेसबुक वॉलवरुन 

| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - मंगळवार दि. २४ जून २०२५

राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या चांगलाच पेटलेला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले गेले होते, मग आता या वचनापासून माघार का?" असा संतप्त सवाल करत त्यांनी सरकारला जाब विचारला आहे.

कराड येथील पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. त्यांनी यावेळी स्पष्टपणे विचारले, “उद्योजकांची कर्जमाफी करताना कोणतीही समिती नेमली नाही, मग शेतकऱ्यांकरता नियम-कायदे का लावले जातात? बुलेट ट्रेनसाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध असतो, पण शेतकऱ्यांसाठी काहीच उरलेले नाही का?”

राज्यात सध्या सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा स्थितीत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज शेट्टी यांनी अधोरेखित केली. “सततच्या पावसामुळे नुकसान होऊनही अतिवृष्टीची नोंद होत नाही. अशा अपुऱ्या निकषांमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीचा धोका गंभीर बनला आहे. कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणीपातळी वाढत असून, अयोग्य धरण व्यवस्थापन, नदीपात्रातील अडथळे आणि चुकीच्या ठिकाणी उभारलेले पूल यामुळे पूरस्थिती अधिक तीव्र होत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

या प्रश्नांकडे सरकारने गंभीरपणे लक्ष दिले नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.