yuva MAharashtra झाड तोडलं... घरटं कोसळलं... पिल्लंही गेली... आणि यंत्रणेतील माणसं शांत बघत उभी राहिली!

झाड तोडलं... घरटं कोसळलं... पिल्लंही गेली... आणि यंत्रणेतील माणसं शांत बघत उभी राहिली!


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. २३ जून २०२५

झाड तोडलं... घरटं कोसळलं... पिल्लंही गेली... आणि यंत्रणेतील माणसं शांत बघत उभी राहिली!

आज पुन्हा एकदा मन सुन्न करणारी घटना घडली. महापालिकेच्या निर्दयी यंत्रणेनं कर्नाळ पोलिस चौकीजवळील पेट्रोल पंपाच्या परिसरात असलेले एक पिंपळाचे झाड मोडून टाकले. झाड कापले गेले, त्यासोबत त्यावर वसलेली घरटीही उद्ध्वस्त झाली. आणि काही क्षणांतच अनेक निरागस पक्षीपिल्लांचं आयुष्य संपलं. त्यांच्या आईनेही झटकन मान टाकली.

एकदा तरी झाडांवर घरटी बांधणाऱ्या त्या छोट्याशा जीवांची आर्त किंकाळी ऐकायला कुणी नव्हतं. यंत्रणा मात्र नेहमीसारखीच बघ्याची भूमिका घेत शांत उभी राहिली – "यात एवढं काय?" असा थंडपणा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

पक्ष्यांची घरटी, त्यातली पिल्लं, त्यांची माता – सगळ्यांचा एकत्र अंत झाला. कटरने झाड कापलं तेव्हा जमिनीवर पडलेली पिल्लं हालचालही करू शकत नव्हती. काही पायांवरून चिरडली गेली. मृत्यूचा साक्षात्कार अगदी क्षणात झाला.

ही माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आणि प्राणीमित्र घटनास्थळी धावले. त्यांनी झाडाची होणारी कत्तल रोखली. या कृत्याबाबत संबंधित पालिका किंवा वनविभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती, हे स्पष्ट झाले. पथक आले, साहित्य जप्त झाले, पण रात्री उशिरापर्यंत गुन्हा मात्र दाखल झाला नव्हता.

या घटनेची सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. मात्र काही राजकीय मंडळींनी कार्यकर्त्यांवर दबाव टाकून 'पोस्ट' हटवण्यास सांगितलं, ही बाब अधिकच वेदनादायक होती. झाडं तोडल्यावरही, पिल्लं मरण पावल्यावरही, या सगळ्याचा सत्ताधाऱ्यांवर काहीही परिणाम झाला नाही. उलट एकमेकांना वाचवण्याचा खेळ सुरू राहिला.


या वेळी माजी मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, प्राणिमित्र विशाल चव्हाण, मुस्तफा मुजावर, तबरेज खान, सुहास पाटील, मंदार साळुंखे, वृक्ष समितीचे प्रदीप सुतार घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी पालिका आणि वनविभागाकडे कारवाईची मागणी केली.

"शहरात अशा बेकायदेशीर झाडांच्या कत्तली थांबल्या नाहीत, तर आम्हालाच काही टोकाची भूमिका घ्यावी लागेल."
– सचिन कदम, सामाजिक कार्यकर्ते

"वृक्ष समितीची भूमिका यावर प्रश्नचिन्ह उभी करते. पक्ष्यांची घरटी हलवता आली असती, पण ती वेळ आलीच नाही. आता यावर गंभीर कारवाई झाली पाहिजे."
– अजितकुमार पाटील, माजी मानद वन्यजीव रक्षक

ही घटना केवळ एका झाडाच्या किंवा पक्ष्यांच्या मृत्यूपुरती मर्यादित नाही. ही आपल्यामधल्या संवेदनाहीनतेची, शहरी निष्ठुरतेची, आणि नैसर्गिक जगताविषयी असलेल्या उदासीनतेची भयावह साक्ष आहे. आज झाड पडलं, उद्या जंगलं पडतील... आणि एक दिवस आपणच त्या सावलीपासून वंचित राहू.