yuva MAharashtra अहमदाबाद विमान दुर्घटनेत २४१ हून अधिक मृत्यु; माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही दुर्दैवी अंत

अहमदाबाद विमान दुर्घटनेत २४१ हून अधिक मृत्यु; माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही दुर्दैवी अंत


| सांगली समाचार वृत्त |
अहमदाबाद - शुक्रवार दि. १३ जून २०२५ 

अहमदाबाद विमानतळावरून दुपारी १:३८ वाजता उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान काही क्षणांतच शहरातील रहिवासी भागात कोसळले. या हृदयद्रावक अपघातात २४२ प्रवासी व क्रू सदस्यांपैकी २४१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, बचावलेला एकमेव प्रवासी रमेश विश्वकुमार याने या दुर्घटनेचे थरारक तपशील सांगितले आहेत.

या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. मृतांमध्ये बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात राहणाऱ्या २४ डॉक्टर विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश असून, भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी त्यांच्या निधनास दुजोरा दिला आहे.

बचाव कार्य युद्धपातळीवर

विमान कोसळताच स्फोट होऊन परिसरात विनाशाचं तांडव घडलं. अपघातस्थळी अग्निशमन दल, पोलीस, एनडीआरएफचे जवान बचावकार्यात तातडीने सहभागी झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली.

मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे

अनेक मृतदेह इतके विखुरलेले आहेत की त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीचा आधार घ्यावा लागत आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतांच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने घेतले जात आहेत. जखमींवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

मृतांमध्ये महाराष्ट्रातीलही नागरिक

या अपघातात महाराष्ट्रातील अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, रोशनी सोनधरे यांच्यासह इतर प्रवाशांचाही समावेश आहे. अपर्णा महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असून, त्यांचे पती देखील एअर इंडियात कार्यरत असल्याचे समजते.


देव तारी त्याला कोण मारी ?

विमानातील एकमेव बचावलेले प्रवासी रमेश विश्वकुमार यांनी सांगितले की, विमान कोसळण्याआधीच एक मोठा स्फोट झाला. ते ११ नंबरच्या सीटवर होते. विमान कोसळल्यानंतर त्यांनी खाली उडी मारली. आणि स्वतः पायी चालत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर जखमा असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु यामुळे देव तारी त्याला कोण मारी ? या म्हणीचा प्रत्यंतर आले.

पायलट व क्रूची माहिती

विमानाचं संचालन सीनियर कॅप्टन सुमित सभरवाल करत होते, त्यांना ८२०० तास उड्डाणाचा अनुभव आहे. फर्स्ट ऑफिसर क्लाईव सुंदर यांचीही यात साथ होती. अपघाताचं नेमकं कारण तांत्रिक बिघाड असू शकतो, कारण हे विमान मागील दोन दिवस अहमदाबादमध्येच थांबलेले होते.

टाटा समूहाचा मदतीचा हात

या दुर्घटनेनंतर टाटा समूहाने पुढाकार घेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या संपूर्ण वैद्यकीय उपचारांची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे. बी. जे. मेडिकल वसतिगृहाच्या पुनर्बांधणीसाठीही टाटा समूह मदत करणार असल्याचे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी जाहीर केले.