yuva MAharashtra सांगली महापालिकेचा अभिनव उपक्रम : पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच वातानुकूलित सार्वजनिक टॉयलेट्सचा शुभारंभ

सांगली महापालिकेचा अभिनव उपक्रम : पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच वातानुकूलित सार्वजनिक टॉयलेट्सचा शुभारंभ


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनि दि. १४ जून २०२५ 


सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेने स्वच्छता व नागरी सुविधा वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, वुलू कंपनीच्या सहकार्याने सांगलीत प्रायोगिक स्वरूपात दोन अत्याधुनिक वातानुकूलित सार्वजनिक शौचालयांचे उद्घाटन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे, ज्यात एसीयुक्त टॉयलेट्स नागरिकांच्या सेवेत सज्ज झाले आहेत.

हे आधुनिक शौचालय केंद्र ‘पावडर रूम’ या नावाने ओळखले जाणार असून सध्या विश्रामबाग बस स्थानक व नेमिनाथ नगर मैदान येथे दोन केंद्रांची उभारणी पूर्ण झाली आहे. पुढील टप्प्यात एकूण वीस ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक पावडर रूममध्ये पुरुष व महिलांसाठी चार शौचालय युनिट्स असून, त्याच परिसरात एक लघु किराणा स्टोअरदेखील आहे, जिथे गरजेच्या खाण्यापिण्याच्या व वैयक्तिक वस्तू उपलब्ध असणार आहेत. ही सुविधा केवळ दहा रुपये प्रति वापर या किफायतशीर दरात मिळणार असून, नागरिकांना मासिक पास ९९ रुपयांत व वार्षिक पास फक्त ३६५ रुपयांत मिळू शकतो. विशेष बाब म्हणजे हा पास देशभरात वुलूच्या इतर स्टोअरमध्येही वापरता येणार आहे.


या उपक्रमाचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते, तसेच आयुक्त सत्यम गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक संतोष पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

सांगली महापालिकेचा हा उपक्रम केवळ स्वच्छता नव्हे तर नागरी सन्मान आणि सुविधा यांचा आदर्श ठरणार असून, भविष्यात अशा सुविधा इतर शहरी भागातही सुरू करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.