| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. २२ जून २०२५
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवलेले सुमारे २३६ कोटी रुपयांचे ठेवी मुदत संपण्यापूर्वीच मोडून खासगी बँकांमध्ये वर्ग केल्याचा मुद्दा चांगलाच गाजू लागला आहे. या संदर्भातील प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर झाला असून, त्यातून तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या ठेवी पूर्वी कॅनरा बँक, युनियन बँक व बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, मुदत न संपताच या सर्व ठेवी तोडून खासगी बँकांत वर्ग करण्यात आल्या. या प्रक्रियेमुळे महापालिकेला १ ते १.५ टक्के इतकी प्री-मॅच्युअर क्लोझर दंडात्मक रक्कम भरावी लागली असून, सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाजित आहे.
या आर्थिक व्यवहारावर शहर व नागरिक विकास मंचने आवाज उठवला होता. त्यांनी हा निर्णय नागरिकांच्या कररूपात जमा झालेल्या निधीचा अपव्यय असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे संबंधित प्रशासनाकडून उत्तरदायित्वाची मागणी होत आहे.
ही आर्थिक फेरबदल तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळात करण्यात आल्याने त्यांच्यावर लक्ष केंद्रीत झाले आहे. या विषयावर त्यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई त्याकाळात झाल्याचे आढळलेले नाही.
दरम्यान, राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुप्ता यांच्या कार्यकाळातील इतर निर्णयांची चौकशी सुरू केल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच जाहीर केले. त्यामुळे ठेवी प्रकरणही अधिक गंभीर बनले आहे.
मुख्य लेखाधिकाऱ्यांचीही चौकशी
या व्यवहारात महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी अभिजीत मेंगडे यांच्यावरही चौकशी सुरू झाली आहे. ठेवी वर्ग करण्याचा आदेश नेमका कुणाकडून आला, हे शोधण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. शासन आदेशाचे अयोग्य अर्थ लावून ही आर्थिक हलवड केली गेल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे गुप्ता यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.