yuva MAharashtra सांगलीत साडेपाच लाख नागरिकांचा 'भक्तियोग' उपक्रम; तीन विश्वविक्रम नोंदवले

सांगलीत साडेपाच लाख नागरिकांचा 'भक्तियोग' उपक्रम; तीन विश्वविक्रम नोंदवले


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. २२ जून २०२५

सांगली – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगली जिल्ह्याने इतिहास रचला. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सुमारे ५.५ लाख योगप्रेमींनी एकाच वेळी तालवारकरी संप्रदायाच्या भक्तीरसात न्हालेल्या तालावर योगासने साकारत योगाच्या क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला. या अभिनव उपक्रमातून तीन वेगवेगळ्या विश्वविक्रमांची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली.

या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन सांगली जिल्हा परिषद व चितळे डेअरी, विश्व योग दर्शन केंद्र, आणि विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, सांगली येथे संपन्न झाला. या वेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे अध्यक्षस्थानी होते.

त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानसिक आरोग्यासाठीही आवश्यक साधना आहे. अशा उपक्रमांतून समाजामध्ये आरोग्याविषयी जागृती होते आणि सातत्याने योग करत राहण्याची प्रेरणा मिळते."

जिल्हाभरातील १६०० हून अधिक केंद्रांवर एकाच वेळी झालेल्या या सामूहिक योगसाधनेत महिलांचा आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला. या उपक्रमाची संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन यशस्वीपणे पार पडले.


या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, तसेच योग प्रशिक्षक बाळकृष्ण चिटणीस, अंजली चिटणीस, हर्षद गाडगीळ, शैलेश कदम आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

योगसाधनेस प्रारंभ भक्तिगीतांनी झाला. अभिषेक तेलंग आणि कीर्ती पेठे यांच्या गायनाला भास्कर पेठे, प्रशांत भाटे, अक्षय कुलकर्णी आणि परेश पेठे यांनी संगीताची साथ दिली. या वेळी पारंपरिक झिम्मा-फुगडी सत्रही पार पडले आणि उपस्थितांनी आनंददायक वातावरणात सहभाग घेतला.

समान तालावर, समान रचना आणि प्रशिक्षकांच्या एकसंध मार्गदर्शनाखाली झालेला हा योग उपक्रम 'भक्तियोग' म्हणून नोंदवला गेला. तो आरोग्य, अध्यात्म आणि सामाजिक ऐक्य यांचा त्रिवेणी संगम ठरला. हा उपक्रम आरोग्यप्रेम, भक्तिप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचे एकत्रित दर्शन ठरला.