yuva MAharashtra अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा प्रतिहल्ला; इस्रायलच्या १० शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा प्रतिहल्ला; इस्रायलच्या १० शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा


| सांगली समाचार वृत्त |
तेहरान - रविवार दि. २२ जून २०२५

इस्रायल आणि इराणमधील तणाव अधिक तीव्र झाला असून, आता अमेरिकेच्या थेट हस्तक्षेपामुळे या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. अमेरिकेच्या कारवाईनंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत इस्रायलच्या दहा शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. या शहरांमध्ये राजधानी तेल अवीव आणि हैफाचा समावेश आहे. या हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य प्रसारक ‘कान’ने दिलेल्या माहितीनुसार, इराणने एकूण दहा ठिकाणांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे डागली. या हवाई हल्ल्यांदरम्यान सतर्कतेचे सायरन वाजू लागले, परिणामी नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.

हवाई क्षेत्र पूर्णत: बंद

इराणच्या या तीव्र हल्ल्यानंतर इस्रायलच्या हवाई क्षेत्राचे नियंत्रण करणाऱ्या आयएए (IAA) संस्थेने देशातील संपूर्ण हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. एल अल आणि अर्किया या प्रमुख इस्रायली विमान कंपन्यांनीही सर्व उड्डाणे पुढील आदेश येईपर्यंत थांबवली आहेत. मात्र, इजिप्त आणि जॉर्डनमार्गे स्थलसीमा खुल्या राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नुकसानीची प्राथमिक माहिती

इस्रायली आपत्कालीन सेवा ‘मॅगेन डेव्हिड अ‍ॅडोम’ने काही ठिकाणी जखमींची नोंद केली असून, मृतांची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्कर IDF ने पश्चिम इराणमधील लष्करी तळांवर जोरदार हवाई हल्ला चढवला.

IDF कडून स्पष्टीकरण

इस्रायली लष्कराकडून सांगण्यात आले की, इराणकडून डागण्यात आलेल्या किमान २७ क्षेपणास्त्रांमध्ये काही इस्रायली शहरांना लक्ष्य करण्यात आले. यातील एक क्षेपणास्त्र तेल अवीवमध्ये राहणीवस्तीत कोसळले, तर दुसरे नेस त्झिओनाच्या परिसरात. या घटनांमध्ये मिळून २० पेक्षा अधिक नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.


सायरन प्रणालीबाबत शंका

हैफामधील सायरन न वाजण्यावरून प्रश्न निर्माण झाले आहेत. आयडीएफच्या प्राथमिक तपासणीत इंटरसेप्टर सिस्टम बिघडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, सायरन यंत्रणेवर बिघाड असल्याचे नाकारण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.

क्लस्टर बॉम्ब वापरल्याचा संशय

इराणने या हल्ल्यांदरम्यान क्लस्टर बॉम्ब वापरले का, याबाबतही चौकशी सुरू असून, अद्याप कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत.

गेल्या आठवड्यात इस्रायलने "ऑपरेशन रायझिंग लाईन" अंतर्गत इराणच्या अणुउद्योगांवर कारवाई केली होती, त्याच्या प्रत्युत्तरात इराणने या मोठ्या प्रमाणावर हल्ल्यांची मालिका उघडली आहे.