| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - सोमवार दि. १६ जून २०२५
राज्यातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आता एसटी बसपाससाठी आगारात रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार, विद्यार्थ्यांना त्यांचे मासिक बस पास थेट त्यांच्या शाळा व महाविद्यालयांमध्येच वितरित केले जाणार आहेत.
शैक्षणिक वेळ वाचणार, त्रास टळणार
नवीन शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू होत असून, यासाठी एसटी महामंडळाने “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, शाळा व महाविद्यालयांनी तयार केलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीनुसार एसटीचे कर्मचारी थेट शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन पास वाटप करतील. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून पास घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
६६.६६ टक्के सवलतीचा लाभ
शासन विद्यार्थ्यांसाठी एसटी प्रवासात ६६.६६% इतकी विशेष सवलत देते. विद्यार्थ्यांना मासिक पास मिळवण्यासाठी केवळ ३३.३३% शुल्क भरावे लागते. तसेच, “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना” अंतर्गत बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींसाठी मोफत एसटी पासचा लाभ दिला जातो.
लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
आतापर्यंत विद्यार्थ्यांना पाससाठी आगारात जावे लागे, लांब रांगा लावाव्या लागत किंवा शाळांनी गट तयार करून आगाराशी संपर्क साधावा लागत होता. आता या सर्व झंझटींना पूर्णविराम देत ही अभिनव योजना लाखो विद्यार्थ्यांसाठी दिलासा ठरणार आहे. आगार व्यवस्थापकांनी शाळा आणि महाविद्यालयांशी समन्वय साधून विद्यार्थी याद्या आधीच तयार ठेवण्यास सांगितले आहे.
म्हणूनच आता ‘एसटी पाससाठी रांगेत उभं राहा’ हे वाक्य इतिहासजमा होणार आहे. बस पास आता थेट तुमच्या शाळेत मिळणार – सहज, सोपं आणि वेळ वाचवणारं!