| सांगली समाचार वृत्त |
मिरज - बुधवार दि. २५ जून २०२५
कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर निलजी-बामणी परिसरात भाजीपाल्याच्या पोत्यांआड लपवलेला सुमारे ११ लाखांचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा पुष्पाफेम वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात पोलिसांना यश आले. यावेळी टेम्पोचालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मिरजमधील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली असून, प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तींमध्ये राजकुमार निगाप्पा बुदीहाल (वय ३०, रा. यड्राव), हारुण शौकत हुकीरे (वय ४४, रा. इचलकरंजी), आणि रिहानमलिक मुबारक मुल्ला (वय २४, रा. शहापूर, दत्तनगर) यांचा समावेश आहे.
नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत प्रतिबंधित पदार्थांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तपास सुरू केला होता. याच दरम्यान, सहायक निरीक्षक शिंदे यांना आयशर टेम्पो (MH 15 FV 1108) मधून सुगंधी तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
पथकाने निलजी-बामणी उड्डाण पुलाजवळ सापळा रचून टेम्पोची धरपकड केली. तपासणी दरम्यान भाजीपाल्याच्या पोत्यांमध्ये लपवलेला ५६० किलो वजनाचा सुगंधी तंबाखू आढळून आला. आरोपींनी कर्नाटकातून हा तंबाखू आणून विक्रीसाठी इचलकरंजी भागात आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी टेम्पो व तंबाखूसह एकूण ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्पाली गायकवाड, पोलीस कर्मचारी संदीप गुरव, अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, सूरज पाटील, नानासाहेब चंदनशिवे, राजेंद्र हारगे, विनोद चक्षाण, अमोल तोडकर, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, मोसीन टिनमेकर आणि चालक श्रेणी उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.