| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. २५ जून २०२५
सकाळच्या धावपळीत पतीसोबत कामावर निघालेल्या तरुणीचा काळाने घात केला. सांगलीच्या विश्रामबाग उड्डाणपुलावर मंगळवारी (दि. २४) सकाळी भीषण अपघातात नवविवाहित पत्नीचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या काँक्रीट मिक्सर डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
मृत महिलेचे नाव पूनम सुशांत जाधव (वय २५, रा. कवलापूर, ता. मिरज) असे असून, त्यांचे पती सुशांत जाधव किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की पूनम डंपरखाली आल्याने जवळपास ५० फूट फरफटत गेल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. सुशांत यांना रस्त्याच्या कडेला फेकले गेले.
सुशांत आणि पूनम या नवदाम्पत्याचा हा नेहमीचा प्रवास होता. रोज सकाळी एकत्र कामावर जाण्याचा दिनक्रम त्यांनी दीड वर्षांपासून सुरू ठेवला होता. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दोघे विश्रामबाग उड्डाणपुलावरून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने त्यांची दुचाकी चिरडली.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. संतप्त नागरिकांनी थोड्या अंतरावर डंपरला थांबवून चालकाला पकडले व त्याला चोप दिला. पूनम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत डंपर चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या अपघातामुळे नलवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.