| सांगली समाचार वृत्त |
शिर्डी - दि. १ जून २०२५
शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानातील लेखा विभागात कार्यरत असलेल्या शिपाई बाळासाहेब नारायण गोंदकर याने संस्थेच्या दक्षिणा पेटीतून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संस्थानचे लेखाधिकारी अविनाश विनायक कुलकर्णी यांनी या संदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एप्रिल 2025 महिन्यातील दक्षिणा मोजणीवेळी या चोरीचा प्रकार घडला. साई संस्थानच्या माहितीनुसार, 4, 8 आणि 11 एप्रिल रोजी गोंदकर याने दक्षिणा मोजणीच्या वेळी 500 रुपयांच्या नोटांची बंडल चतुराईने लपवून चोरून नेली. सीसीटीव्ही फुटेजमधून हा प्रकार उघड झाला असून, संबंधित रक्कम अंदाजे 1.25 ते 1.5 लाख रुपयांदरम्यान असल्याचा अंदाज आहे. याशिवाय 16 एप्रिल रोजी 46,500 रुपये आणि 25 एप्रिलला आणखी एक 500 रुपयांच्या नोटांचा बंडल सापडल्याची नोंद आहे.
गोंदकर याला सीसीटीव्ही तपासणीत रोख रक्कम लपवत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्याने नोटा मांडीखाली, पॅन्टमध्ये आणि नोट मोजणी मशिनच्या मागे लपवून ठेवून नंतर त्या चोरल्या. या प्रकाराची माहिती मिळताच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या निर्देशानुसार त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सुरुवातीला त्याला निलंबित करण्यात आले होते, मात्र तपासात दोषी आढळल्याने आता त्याच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिर्डी पोलीस अधिक तपास करत आहेत.
46 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीला अटक
कोपरगाव : टाकळी परिसरात बिनशेती प्लॉट स्वस्तात मिळवून देतो, असे आमिष दाखवून तब्बल 29 नागरिकांकडून 46 लाख रुपये उकळणारा शिवम दास शेवटी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. या प्रकरणी 27 मार्च 2024 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शिवम दास आणि त्याचा साथीदार दीपक करण यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून हे दोघेही फरार होते.
शिवम दास याने वर्षभर पोलिसांना चकवा दिला होता. अखेर पुणे पोलिसांच्या एका कारवाईत तो अटकेत आला. त्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे व त्यांच्या पथकाने बुधवारी त्याला आपल्या ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.