| सांगली समाचार वृत्त |
पुणे - शनिवार दि. २१ जून २०२५
संत परंपरेचा महिमा जपणाऱ्या वारीत दरवर्षी उत्साहाने सहभागी होणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांनी यंदा परंपरेत एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वारीत ते प्रत्यक्ष सहभाग न घेता, केवळ संतांची पालखी दर्शन घेण्यापुरतेच उपस्थित राहणार आहेत.
पुण्यातील प्रसिद्ध जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, त्यानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात दर्शन घेण्यात आले. राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या धारकऱ्यांना वेळेत घरी परतता यावे, यासाठी ही बदललेली योजना आखण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत धारकऱ्यांनी तलवार नाचवत वारीत सहभाग घेतल्यामुळे वाद उद्भवले होते. भक्ती, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या वारीमध्ये शस्त्रप्रदर्शनामुळे शांतीभंग झाल्याची भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिस हस्तक्षेप करावा लागला आणि धारकऱ्यांवर टीकाही झाली.
त्या पार्श्वभूमीवर यंदा शिवप्रतिष्ठानने आपली भुमिका अधिक शांत, सुसंवादी ठेवण्याचा निर्णय घेतला असून, वारकरी संप्रदायाच्या भावना जपण्यासाठी फक्त पालखीचे दर्शन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी पुण्यात मुक्कामी असलेल्या दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी धारकरी दाखल झाले. संचेती हॉस्पिटलजवळ धारकऱ्यांनी, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी 'विठ्ठल-विठ्ठल' आणि 'रामनामाचा जयघोष' करण्यात आला. विशेष म्हणजे, भिडे गुरुजींनी स्वतः पालखीच्या सारथ्याची भूमिका पार पाडली.
वारीचा उत्सव, त्यातील भक्तिभाव आणि वारकरी संप्रदायाचा संदेश यंदा अधिक संयमाने आणि शिस्तबद्धतेने मांडण्याचा शिवप्रतिष्ठानचा प्रयत्न लक्षवेधी ठरतो आहे.