| सांगली समाचार वृत्त |
टाळगाव-चिखली- गुरुवार दि. १९ जून २०२५
आपल्या समृद्ध संस्कृतीतील संतांची विचारधारा आणि परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच दृष्टीने श्रीक्षेत्र टाळगाव-चिखली येथे स्थापन करण्यात आलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठात विद्यार्थ्यांना अध्यात्म, संस्कार आणि आधुनिक शिक्षणाचा समन्वय साधणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. येथून घडणारे विद्यार्थी भागवत धर्माचे जागतिक दूत बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
या संतपीठाच्या कलादालन व सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, संतपीठाचे संचालक डॉ. सदानंद मोरे, समिती सदस्य, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्रातील संतपरंपरेचा गौरव करत, संतपीठाच्या माध्यमातून संतसाहित्याचे संपूर्ण शिक्षण मराठी, संस्कृत, हिंदी व इंग्रजी अशा चार भाषांमध्ये 'CBSE' अभ्यासक्रमांतर्गत दिले जाईल, अशी माहिती दिली. तसेच इथे शास्त्रीय वाद्यांचे प्रशिक्षण, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सभागृह, वाचनालय, क्रीडांगण यांसह बहुउपयोगी सुविधा उपलब्ध असणार आहेत.
संतपीठाच्या पुढील टप्प्यात पंढरपूर व आळंदी येथे नवे संतपीठ केंद्र विकसित करण्यात येणार असून, शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठी ही ज्ञानभाषा म्हणून विकसित होत असून, मराठीला जागतिक स्तरावर नेण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. मात्र, आपल्या भाषेचा अभिमान बाळगतानाच इतर भारतीय भाषांप्रती आदर असावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
संतपीठाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे यांनी या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करत, संतांचे विचार आधुनिक पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही संस्था एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. संतपीठाच्या पुढील संकल्पना शासनाने यथायोग्य स्वीकारून साथ द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
यावेळी संत मल्हारपंत कुलकर्णी गायन कक्ष, संत सोनबा ठाकूर पखवाज कक्ष, पंडित अरविंद मुळगावकर तबला कक्ष, ह.भ.प. महादजी शिंदे सभागृह यांचे उद्घाटन तसेच अभ्यास साहित्याचे प्रकाशन करण्यात आले.
याच कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पुणे-आळंदी पालखी मार्गावरील संत ज्ञानेश्वर व संत नामदेव महाराज यांच्या संगमरवरी शिल्पसमूह व संतसृष्टीचे उद्घाटनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या संतसृष्टीत २५ मिश्र धातूची शिल्पे व ४७ कास्यधातूची भित्तीचित्रे असून, संतांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवले आहे. या प्रकल्पासाठी ३० कोटी ६९ लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
याशिवाय, पर्यावरण रक्षणासाठी महापालिकेच्या वतीने या वर्षी १.५ लाख देशी झाडांची लागवड करण्यात येणार असून, याचा प्रारंभही या कार्यक्रमात करण्यात आला.