| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - गुरुवार दि. १९ जून २०२५
स्व. वसंतराव पाटील यांच्या नातसून आणि स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या घडामोडीमुळे सांगलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांपैकी एक असलेल्या सांगलीत आता पक्षासाठी नवे आव्हान उभे राहिले आहे. कारण, वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील एक मोठा गट थेट भाजपमध्ये सामील झाला आहे.
जयश्री पाटील सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा असून त्या जिल्ह्यातील एक प्रभावशाली नेत्या म्हणून ओळखल्या जातात. दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या राजकीय वारशाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश ही पक्षासाठी मोठी राजकीय ताकद ठरणार आहे.
या प्रवेशानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “भाजपचं कार्यक्षेत्र सांगली जिल्ह्यात सातत्याने विस्तारत आहे. महापालिका, जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभेत यश मिळवले आहे. अशा वेळी वेगवेगळ्या पक्षांतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नेतृत्व भाजपमध्ये यावं, हीच आमची इच्छा होती,” असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी एका खास आठवणीचा उल्लेखही केला. “जयश्रीताईंनी मला स्वतः फोन करून सांगितलं होतं की, ‘तुम्हीच माझ्या प्रवेशासाठी या.’ सामान्यत: प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश कार्यक्रम होतो, पण वसंतदादांच्या घराण्यातून एखादी व्यक्ती येत असेल तर मी स्वतः हजर राहणं आवश्यक मानलं. म्हणून मी या कार्यक्रमाला आलो,” असे ते म्हणाले.
या प्रवेशामुळे भाजपच्या सांगलीतील संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.