| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - गुरुवार दि. १९ जून २०२५
पंढरीच्या आषाढी वारीचे वातावरण राज्यभर दाटले असून, यंदा सायकलवरून वारी करणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. महाराष्ट्रातील जवळपास ९० ठिकाणांहून ३ ते ४ हजार सायकलपटू पंढरपूरच्या दिशेने कूच करत असून, २२ जून रोजी पंढरी नगरीत भव्य सायकल रिंगण सोहळा पार पडणार आहे.
यावेळी अमरावती सायकल असोसिएशनचे ४० जणांचे पथक १८ जून रोजी सकाळी सहा वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. विशेष बाब म्हणजे, या गटात पाच महिलांचा सहभाग असून, महिलांनी अशा स्वरूपाच्या सायकलवारीत प्रथमच सहभाग नोंदवला आहे. शालिनी महाजन, वर्षा सदार, शालिनी शेवानी, दिव्या मेश्राम व जयमाला देशमुख या महिला सायकलपटूंमध्ये अग्रणी आहेत.
५५० किलोमीटरचे हे अंतर फक्त चार दिवसांत पार करून हे पथक २१ जूनच्या रात्री पंढरपूरमध्ये पोहोचेल. दररोज किमान १८ किमी वेगाने सायकल चालवत हा प्रवास पूर्ण केला जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून अमरावतीतून काही निवडक सायकलपटू वारीत सहभागी होत होते. परंतु यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने सायकलपटू पंढरपूर वारीसाठी सज्ज झाले आहेत.
या वर्षीच्या सायकलवारीत १६ ते ६६ वर्षे वयोगटातील सायकलपटू सहभागी झाले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे, अमरावतीचे ६६ वर्षीय पवनकुमार रामावत यांचाही यात समावेश असून, ही त्यांची पहिलीच वारी आहे. केवळ तीन महिन्यांपूर्वी त्यांनी सायकल असोसिएशनमध्ये सहभाग नोंदवला होता.
२२ जूनच्या पहाटे सायकलपटू नगरप्रदक्षिणा करत सकाळी सात वाजता रेल्वे ग्राउंड येथे भव्य रिंगण सोहळ्यात सहभागी होतील. याआधीही रिंगण सोहळे झाले आहेत, परंतु यंदाचा सोहळा आकार व उत्साहाच्या दृष्टीने अधिक प्रभावी आणि भव्य ठरणार आहे.
यावर्षी या उपक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी लातूर जिल्ह्याला देण्यात आली आहे. सायकलवारीद्वारे पर्यावरण संवर्धन, आरोग्यसंपन्न जीवनशैली आणि प्रदूषणमुक्त भारत या संकल्पनांचा जागर करण्यात येणार आहे.
"प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, आरोग्य राखा" – असा जनजागृतीपर संदेश या पवित्र वारीच्या माध्यमातून दिला जाणार असल्याची माहिती अमरावती सायकल असोसिएशनचे सचिव अतुल कळमकर यांनी दिली.