| सांगली समाचार वृत्त |
तेहरान - गुरुवार दि. १९ जून २०२५
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असून, इस्रायलकडून इराणवर जोरदार हवाई कारवाया केल्या जात आहेत. इराणची राजधानी तेहरानमध्ये सोमवारी रात्री जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले असून, आकाशात धगधगत्या आगीच्या ज्वाळा उंचावताना दिसून आल्या.
ही कारवाई तेहरानच्या लावीझान परिसरात झाल्याचे समजते. या भागात इराणचे क्षेपणास्त्र कार्यक्रम, संरक्षण संबंधित बंकर आणि लष्करी सुविधा असल्याचे माहिती स्रोतांकडून सांगण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचं सुरक्षाबंकर देखील याच भागात असल्याची चर्चा आहे.
खोमेनी लक्ष्य?
या कारवाईचा रोख अयातुल्ला खोमेनी यांच्यावर होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण काही तासांपूर्वीच खोमेनी यांनी इस्रायल आणि अमेरिका यांना इशारा देणारे भाषण केलं होतं. त्यानंतर लगेच हा हल्ला घडल्याने संपूर्ण घडामोडींमागे मोठं नियोजन असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
रेकॉर्डेड भाषणामुळे संभ्रम
खोमेनी यांचं संबोधन लोकांपर्यंत पोहोचलं, मात्र ते थेट प्रक्षेपण नव्हतं, तर आधीच रेकॉर्ड केलेलं होतं, अशी माहिती मिळते. हल्ल्यादरम्यान त्यांच्या बंकर परिसराला लक्ष्य केलं गेलं, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी यापूर्वीच सांगितलं होतं की, “खोमेनी यांच्या मृत्यूनंतरच हे युद्ध थांबेल,” हे विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
तेहरानमध्ये भीतीचं वातावरण
इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनंतर तेहरान शहरातील अनेक भागात स्फोट झाले. स्थानिकांनी शूट केलेल्या व्हिडिओंमध्ये नोबोन्याद परिसरासह पूर्व व पश्चिम भागात मोठे स्फोट दिसून आले आहेत. या स्फोटांमुळे आसपासच्या घरांच्या खिडक्याही हादरल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
इराणकडून प्रतिहल्ल्याची शक्यता
या हल्ल्यांमुळे इराणचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, इराणकडून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात प्रतिहल्ला होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. पुढील काही तास हे दोन्ही देशांच्या भविष्यकालीन कृतीसाठी निर्णायक ठरू शकतात.