| सांगली समाचार वृत्त |
देहूगाव - गुरुवार दि. १९ जून २०२५
संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहू नगरीत मोठ्या संख्येने भाविक वारकरी जमले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोहळ्यास उपस्थिती निश्चित झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. दुपारी एक वाजल्यानंतर मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून, ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दुपारी अडीचच्या सुमारास येणार असल्याची माहिती मिळताच, मुख्य प्रवेशद्वारातून जाणाऱ्या दिंड्यांना काही काळासाठी थांबवण्यात आले. यामध्ये मानाचे अश्व आणि माई दिंडी देखील अडकून पडल्या. यामुळे काही वेळासाठी वारकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
सुमारे १५ ते २० मिनिटे या अश्वांना प्रवेशद्वारावर थांबवून ठेवण्यात आले. परिणामी, पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद उद्भवला. अखेर अश्व आणि दिंडींना पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली. मात्र या प्रकारामुळे अनेक वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेले हे पाऊल समजण्यासारखे असले, तरी श्रद्धेचा भाव जपताना व्यवस्थापन अधिक संवेदनशील राहावे, अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.