yuva MAharashtra 'ऑपरेशन सिंधू'च्या माध्यमातून भारताची तातडीची पावले; इराणमधून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढले

'ऑपरेशन सिंधू'च्या माध्यमातून भारताची तातडीची पावले; इराणमधून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढले


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - गुरुवार दि. १९ जून २०२५

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलली असून, 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत इराणमधून भारतीयांची सुटका सुरू करण्यात आली आहे.

ही मोहिम भारताने १९ जूनच्या पहाटे सुरू केली. प्रारंभी, उत्तर इराणमधील ११० भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या स्थलांतरित करून आर्मेनियाच्या सीमारेषेपर्यंत पोहोचवण्यात आले. इराणमधील भारतीय दूतावास आणि आर्मेनियातील दूतावास यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही महत्त्वपूर्ण कृती पार पडली.

सदर विद्यार्थी १८ जून रोजी दुपारी २.५५ वाजता आर्मेनियाची राजधानी येरेवानहून विशेष विमानाने भारतासाठी रवाना झाले असून, ते १९ जूनच्या पहाटे नवी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेसाठी भारत सरकारने इराण व आर्मेनिया सरकारांचे आभार मानले आहेत.

भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, तेहरानमधील भारतीय दूतावास सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, धोका असलेल्या भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. ‘ऑपरेशन सिंधू’ ही मोहिम केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही, तर इराणमधील सर्व भारतीयांसाठी राबवली जात आहे.

तेहरानमधील दूतावासाने भारतीय नागरिकांना त्यांच्या आपत्कालीन हेल्पलाइनशी संपर्कात राहण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीत सुरू केलेल्या २४x७ नियंत्रण कक्षाशीही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


१५ जून रोजी दूतावासाने एक विशेष सूचना जारी करत इराणमधील सर्व भारतीयांना सतर्क राहण्यास, अनावश्यक प्रवास टाळण्यास आणि अधिकृत सोशल मीडिया पृष्ठांद्वारे संपर्कात राहण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, इराण-इस्रायल संघर्षाने आणखी उग्र रूप धारण केले असून सलग सहाव्या दिवशी दोन्ही देशांत क्षेपणास्त्रांचे आदानप्रदान सुरूच आहे. आतापर्यंत या संघर्षात ६०० हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. इराणमध्ये सर्वाधिक ५८५ मृतांची नोंद झाली असून, इस्रायलमध्येही २४ जण मृत्युमुखी पडले असून सुमारे १३०० लोक जखमी झाले आहेत.

इराणने इस्रायलवर ‘फत्ताह-१’ हायपरसोनिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे, तर इस्रायलने त्याचे प्रतिहल्ले मुख्यत्वे तेहरान परिसरावर केंद्रित केल्याचे सांगितले आहे.