yuva MAharashtra घरपट्टी विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल; पत्नीचाही समावेश

घरपट्टी विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल; पत्नीचाही समावेश


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - गुरुवार दि. १९ जून २०२५

महापालिकेतील घरपट्टी विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेला नितीन भिमराव उत्तुरे (वय ६३, रा. सांगलीकर मळा, मिरज) याने आपल्या १९ वर्षांच्या सेवाकाळात अंदाजे ३५ लाख १६ हजार रुपयांची बेहिशोबी संपत्ती जमा केल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) तपासातून उघड झाला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या या आर्थिक गैरव्यवहारात पत्नी वंदना उत्तुरे हिचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून, या दोघांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन उत्तुरे याच्यावर २०१९ मध्ये ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACB ने सापळा रचून कारवाई केली होती. त्यानंतर त्याच्या मालमत्तेची सखोल चौकशी सुरू झाली. तपासाअंती हे स्पष्ट झाले की, त्याने आपल्या उत्पन्नाच्या स्त्रोताशी विसंगत अशी कोट्यवधींची मालमत्ता जमवली होती. या व्यवहारांना पत्नी वंदना उत्तुरे हिचेही समर्थन असल्याचे निदर्शनास आल्याने तिच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.

ही तपासणी उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोरकुमार खाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यासह ACB चे निरीक्षक विनायक भिलारे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तपास पथकात सुदर्शन पाटील, प्रीतम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सीमा माने, चंद्रकांत जाधव, अतुल मोरे, वीणा जाधव, विठ्ठल रजपूत यांचा समावेश होता.


नागरिकांना ACB कडून आवाहन

लोकसेवक, शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमा केल्याचे पुरावे असल्यास टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा ०२३३-२३७३०९५ या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन उपअधीक्षक अनिल कटके यांनी नागरिकांना केले आहे. भ्रष्टाचारविरोधी लढ्यात जनतेचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.