yuva MAharashtra भिवंडीच्या पडघा परिसरात ATS चा छापा: 'शरीयत राष्ट्र' स्थापन करण्याचा कट उघड

भिवंडीच्या पडघा परिसरात ATS चा छापा: 'शरीयत राष्ट्र' स्थापन करण्याचा कट उघड


| सांगली समाचार वृत्त |
भिवंडी - गुरुवर दि. ५ जून २०२५

भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि ठाणे पोलिसांनी संयुक्तरित्या टाकलेल्या छाप्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाचन कुटुंबीयांनी देशात शरीयत कायद्यावर आधारित इस्लामी राष्ट्र स्थापनेसाठी एक गुप्त ‘स्लिपर सेल’ उभारल्याचा खुलासा तपास यंत्रणांनी केला आहे.

ही टोळी मुस्लिम तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना देशविरोधात चिथावणी देत होती, तसेच 'शरीयत ए अल शाम' नावाखाली वेगळी इस्लामी राज्यव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न सुरू होता, अशी माहिती उघड झाली आहे.

मध्यरात्री साकिब नाचनच्या घरावर छापा

ATS ने सोमवारी मध्यरात्री भिवंडीतील बोरीवली गावात साकिब नाचनच्या निवासस्थानी धाड घातली. साकिब नाचन सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) च्या ताब्यात असून, त्याच्या कुटुंबीयांचाही दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. या छाप्यात त्याचा मुलगा शमिल नाचन आणि भाऊ आकीब नाचन यांना अटक करण्यात आली.

‘मंत्रिमंडळ’सदृश रचना आणि १५ तरुणांची भरती

सूत्रांच्या माहितीनुसार, या स्लिपर सेलमध्ये १५ तरुणांना विविध ‘मंत्रीपदां’प्रमाणे भूमिका दिल्या गेल्या होत्या. हे तरुण बोरीवली गावात शरीयत कायद्यावर आधारित स्वतंत्र इस्लामी प्रशासन उभं करण्याच्या कामात गुंतले होते.


बोरीवली गाव 'स्वतंत्र शरीयत राष्ट्र'?

तपासादरम्यान एका गुप्त संदेशातून हेही समोर आलं आहे की नाचन कुटुंबीयांनी बोरीवली गावाला 'शरीयत ए अल शाम'च्या कायद्यानुसार स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं होतं. गावाच्या सीमेवर सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा प्रयत्नही होत असल्याचा संशय आहे.

राज्यभरात एकाचवेळी कारवाई

या प्रकरणाची व्याप्ती भिवंडीपुरती मर्यादित नसून, एनआयएने पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एकाच वेळी छापेमारी करत एक मोठं नेटवर्क उध्वस्त केलं. पडघा गावातून अटक करण्यात आलेल्या १५ संशयितांकडून डिजिटल उपकरणे, दहशतवादी साहित्य आणि पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

सखोल तपास सुरु

एनआयए व ATS संयुक्तपणे या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आणखी काही आरोपी व दहशतवादी संपर्कांचा शोध सुरू आहे. या कटामागे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी संघटनांचा हात असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.