yuva MAharashtra शंभर फुटी रस्त्यावर 500 हून अधिक दुकानांना अतिक्रमण हटावची नोटीस

शंभर फुटी रस्त्यावर 500 हून अधिक दुकानांना अतिक्रमण हटावची नोटीस


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जून २०२५

शहरातील प्रमुख व वर्दळीच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज (शंभर फुटी) रस्त्यालगतच्या सुमारे 500 पेक्षा जास्त दुकाने आणि गाळेधारकांना अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. दुकानासमोरील सामासिक अंतर (फ्रंट मार्जिन) अतिक्रमित केल्यामुळे ही कारवाई केली जात असून, अतिक्रमण काढण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यानंतरही अतिक्रमण न हटवल्यास महापालिका विशेष मोहीम राबवून थेट हटवेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कोल्हापूर रोडपासून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत पसरलेल्या या रस्त्यावर हातगाड्या, रस्त्यावरच सुरू असलेल्या वाहन दुरुस्ती आदी अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या समस्येचा सामना नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत.


महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी अलीकडेच अतिक्रमण हटवण्याचा निर्णय जाहीर केला होता. पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी जागतिक बँकेच्या निधीतून या रस्त्यालगत नव्या गटारांची कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी दोन्ही बाजूंवरील अतिक्रमण हटवणे आवश्यक असल्याचे उपायुक्त वैभव साबळे यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या दुकानदार, व्यावसायिक आणि गाळेधारकांना नोटिसा बजावून 30 दिवसांत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, खासदार विशाल पाटील यांनी शंभर फुटी रस्त्यावरील व्यापाऱ्यांची भेट घेऊन, ही कारवाई थांबवण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. त्यांनी उपायुक्त साबळे यांच्याशी चर्चा करताना सर्वसामान्य व लहान व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी होणाऱ्या गटाराच्या कामाला विरोध नाही, परंतु कारवाई करताना योग्य विचार व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.