yuva MAharashtra UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचे अपडेट; व्यवहारांचा वेग आणि अचूकता वाढणार !

UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचे अपडेट; व्यवहारांचा वेग आणि अचूकता वाढणार !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ मे २०२५

युपीआय वापरणाऱ्यांसाठी एक दिलासाद बातमी समोर आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युपीआय व्यवहार अधिक जलद, अचूक आणि विश्वासार्ह करण्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. हे सुधारित नियम १६ जून २०२५ पासून अंमलात येणार आहेत.

NPCI ने २६ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या सर्क्युलरनुसार, युपीआय प्रणालीत तांत्रिक गती आणि प्रक्रिया सुधारण्यासाठी नवे मानक लागू केले जात आहेत. यानुसार, Request Pay आणि Response Pay सेवा यापुढे फक्त १५ सेकंदांमध्ये पूर्ण होतील. यापूर्वी यासाठी ३० सेकंदांची वेळ लागू होत होती.

तसेच, Check Transaction Status, Transaction Reversal, आणि Validate Address यांसारख्या सेवांसाठी आता फक्त १० सेकंदांची रिस्पॉन्स वेळ निश्चित करण्यात आली आहे. यामुळे व्यवहारातील अनावश्यक विलंब टळून, ग्राहकांचा अनुभव अधिक गतिमान होईल.

या बदलांमागील कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. मार्च आणि एप्रिल २०२५ मध्ये युपीआय प्रणालीत अनेक वेळा अडथळे निर्माण झाले होते. विशेषतः १२ एप्रिल रोजी संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली होती, आणि अनेक व्यवहार अयशस्वी झाले होते. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.


ही पार्श्वभूमी लक्षात घेता, NPCI ने सर्व बँका आणि डिजिटल पेमेंट अ‍ॅप्स (जसे की GPay, PhonePe इ.) यांना या नव्या वेळमर्यादांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचाही निर्देश दिला आहे.

सध्या युपीआयमार्फत दरमहा सुमारे ₹२५ लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतात. वाढत्या वापरकर्त्यांमुळे या सेवेत गती, स्थिरता आणि विश्वासार्हता आणण्याची गरज होती. NPCI च्या या पावलामुळे युपीआय व्यवहार अधिक वेगवान, सुरक्षित आणि वापरकर्ता-मैत्रीपूर्ण ठरणार आहेत.