yuva MAharashtra ग्रंथालयांची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली आवश्यक – ना. चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली आवश्यक – ना. चंद्रकांत पाटील


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २७ मे २०२५

राज्यातील ग्रंथालय व्यवस्थापन अधिक सुटसुटीत व पारदर्शक होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ग्रंथालयांच्या श्रेणीबदल प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात झालेल्या एका विशेष बैठकीत श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथालय संचालनालयाकडून सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उपसचिव अशोक मांडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान मंत्री पाटील यांनी ग्रंथालय श्रेणीकरणाचे निकष स्पष्ट करताना सांगितले की, ‘ड’ वर्गातील ग्रंथालयाने ‘क’ वर्गात जाण्यासाठी किमान १००१ पुस्तके असावीत. त्याचप्रमाणे ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात जाण्यासाठी ५००१ पुस्तके, आणि ‘ब’ वर्गातून ‘अ’ वर्गात जाण्यासाठी १५००१ पुस्तके आवश्यक आहेत.

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयासाठी प्रस्तावित नवीन इमारतीबाबत आणि अधिनस्त कार्यालयांच्या प्रलंबित कामांवरही यावेळी चर्चा झाली. ग्रंथालय प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर केला तर, सेवा अधिक लोकांपर्यंत सहज पोहोचतील, असेही त्यांनी नमूद केले.


या सादरीकरणात ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली, शासकीय अनुदान प्रक्रिया, विभागीय व जिल्हास्तरीय ग्रंथालयांचे कार्य, ग्रंथालय समित्या आणि नव्या ग्रंथ धोरणासंदर्भातही सविस्तर माहिती देण्यात आली.