| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - दि. १५ मे २०२५
गरिबीचे चटके आणि जीवनातील अडथळे मागे टाकत चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठणाऱ्या सृष्टी अनिल महाडिक हिने दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के गुण मिळवत शिवाजी हायस्कूल, चिंचणीच्या (ता. कडेगाव) यशाच्या परंपरेत आपले नाव अजरामर केले आहे.
सृष्टीचे वडील, अनिल महाडिक हे सोनहिरा सहकारी साखर कारखान्यात वॉचमन म्हणून सेवा बजावत आहेत. घरात शेती फारशी शिल्लक राहिलेली नसून, वडिलांची नोकरी आणि थोडीफार शेती यावरच एकत्रित ११ सदस्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आई दीपाली महाडिक या गृहिणी असून घरकामासोबत शेतीचाही आधार घेतात.
या घरात आधी कुणीही उच्च शिक्षण घेतले नव्हते. पण मुलांमध्ये शिक्षणाची आस आणि यशासाठीची जिद्द अफाट आहे. सृष्टीची मोठी बहीण सध्या इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. सृष्टीने मिळवलेले हे घवघवीत यश महाडिक कुटुंबाच्या कष्टमय जीवनात नवचैतन्य घेऊन आले आहे.
परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर कामावरून थकून घरी परतलेल्या वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. लेकीने साधनसंपत्तीची कमतरता विसरून परिश्रमाच्या बळावर मिळवलेले हे यश, त्यांच्यासाठी अभिमानाचे क्षण ठरले. संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. यशाचे नवे टप्पे पार करून आपल्या लेकीने मोठं व्हावं, अशी सदिच्छा वडिलांनी व्यक्त केली.