| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. २६ मे २०२५
पंढरपूर तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीचे पात्र धोक्याच्या पातळीपर्यंत भरून वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, गुरसाळे गावाजवळील नदीपात्रातील महादेव मंदिरात तीन साधू अडकले होते.
सकाळी पूजेच्या निमित्ताने हे साधू मंदिरात गेले होते. मात्र, अविरत पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आणि मंदिराच्या बाहेर येणे अशक्य झाले. अडचणीत आलेल्या साधूंनी गावकऱ्यांकडे मदतीची विनंती केली. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधला.
आपत्ती व्यवस्थापन पथकाची तत्काळ कारवाई
माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बोटीद्वारे तीनही साधूंना सुरक्षितपणे बाहेर काढले. संबंधित साधूंची नावे सुभाष ढवण, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज अशी आहेत.
मंदिर थोडक्याच उंचीवर असल्यामुळे पाणी आत पोहोचले नव्हते, मात्र बाहेरून भरलेल्या पाण्यामुळे बाहेर येणे शक्य नव्हते. विशेष म्हणजे मंदिरात अडकलेल्या या तीन साधूंसोबत एक कुत्र्याचे छोटे पिल्लूही होते. आपत्ती व्यवस्थापन पथकाने सर्व चारही जीवांना सुरक्षित स्थळी हलवले.