| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ मे २०२५
सांगली शहरात पावसाळ्यात होणाऱ्या पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी 596 कोटी रुपयांच्या योजनांना शासनाच्या महसूल (आपत्ती व्यवस्थापन) विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यामुळे शहरातील शामरावनगरसह विविध भागांतील दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
या कामांची अंमलबजावणी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) अंतर्गत जागतिक बँकेच्या सहकार्याने होणार आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या पूर व वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी ही व्यापक योजना राबवली जाणार आहे. संभाव्य आपत्तींचा अंदाज घेता यावा यासाठी प्रगत नकाशांची निर्मिती, अतिवृष्टीमुळे साचणाऱ्या पाण्याचा निचरा, आणि प्रभावी उपाययोजना या प्रकल्पात समाविष्ट आहेत.
महानगरपालिकेने शासनाला सादर केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालात अनेक महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. यात शामरावनगर व परिसरातील पाणी हरिपूर नाल्यात वळवणे, कोल्हापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नवे गटारे बांधणे, गंगोत्रीनगरमधील पाणी अंकली नाल्यात सोडणे, शेरीनाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण, तसेच सुमारे ३ किलोमीटर लांबीचा काँक्रिटचा नाला उभारणे यांचा समावेश आहे. याशिवाय, मिरजेतील मालगाव रोड व वड्डी नाल्यांचे खोलीकरण, नागरी वस्तीजवळील नाल्यांचे काँक्रिटीकरण, व पाईपऐवजी बॉक्स टाईप कलव्हर्ट बांधण्याचेही काम प्रस्तावित आहे.
या योजनांसाठी मार्गदर्शन व धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य सुकाणू समितीने दिनांक 6 मार्च 2025 रोजी कामांना मंजुरी दिली होती. यानंतर नगरविकास विभागाने सहमती दर्शवली आणि महसूल विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. पुढील टप्प्यात तांत्रिक मंजुरी मिळवली जाईल आणि त्यानंतर जागतिक बँकेकडून निविदा प्रक्रियेसाठी अंतिम मान्यता घेतली जाईल.