| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ मे २०२५
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण परिसरात मुसळधार पावसाने हैदोस घातला आहे. विशेषतः पुणे, सातारा, बीड, संभाजीनगर, पालघर आणि वाशीम जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
पुणे जिल्ह्यात वाहतूक विस्कळीत, शेतीचे नुकसान
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ भागात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पाटस परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे शेतमालाचे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही लहान पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. याच दरम्यान, वाहत्या पाण्यात एक कार वाहून गेल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
साताऱ्यातील धुमाळवाडी गाव 35 गावांपासून अलग
साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील धुमाळवाडी परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, या गावाचा आजूबाजूच्या 35 गावांशी संपर्क तुटलेला आहे. अविरत पडणाऱ्या पावसामुळे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पालघर जिल्ह्यात पिके, वीट भट्ट्या संकटात
पालघरमध्ये पावसाचा जोर कायम असून, शेतात काढणीसाठी आलेली पिके पाण्यात गेली आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात वीट भट्ट्या असून सततच्या पावसामुळे त्यांच्यावरही परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बीड-संभाजीनगर संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे बीड आणि छत्रपती संभाजीनगर यांचा संपर्क तुटला आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल अजून बांधकामाच्या अवस्थेत असतानाच कोसळला. परिणामी, नागरिकांना आता १० किमी पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे.
वाशीममध्ये जनावरांचे गोठे उडून गेले
वाशीम जिल्ह्यातील पिंपळगाव भागात जोरदार वाऱ्यासह पावसामुळे एका शेतकऱ्याचा जनावरांचा गोठा उडून गेला आहे. जनावरांसाठी साठवलेला चारा भिजला असून, काही प्रकरणांमध्ये गोठे कोसळल्याने जनावरांना जखमाही झाल्या आहेत.
सिन्नर बसस्थानकात अपघात
नाशिकजवळील सिन्नर बस स्थानकात शिवशाही बसवर सहा नंबर प्लॅटफॉर्मचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून, तातडीने प्रवाशांना बाहेर काढून स्थानक रिकामे करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरातील काही मुख्य रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
सिंधुदुर्गातही पावसाचा जोर कायम
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये पाण्याचे लोट वाहू लागल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे.