| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ मे २०२५
सांगली शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागांत शनिवारीही पावसाचा जोर कायम राहिला. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. दुपारनंतर थोडीशी उघडीप मिळाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा मुसळधार सरी कोसळल्या. संततधार पावसामुळे लहान-मोठे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले असून, कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
गेल्या सहा दिवसांपासून पावसाची ही मालिका सुरूच असून, यामुळे खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होत आहे. मशागतीची कामे रखडली आहेत. शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाच्या विश्रांतीकडे लागले आहे. काही भागांत शेतांमध्ये पाणी साचल्याने नुकसान टाळण्यासाठी शेतकरी पाणी काढण्याच्या प्रयत्नात आहेत.
वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, जत आणि मिरज पश्चिम भागांमध्ये पावसाची जोरदार नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे काही ठिकाणी फळबागा आणि उन्हाळी पिकांनाही फटका बसल्याचे चित्र आहे.
शहरातही पाणी तुंबले, नागरिकांची गैरसोय
सांगली शहरात सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्यामुळे शिवाजी मंडई, स्टेशन रोड, शामरावनगर आदी भागांत रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी नागरिक अडकले होते.
पावसाच्या विश्रांतीकडे साऱ्यांचे लक्ष
खरीप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हवामान शांत होण्याची प्रतीक्षा शेतकरी वर्ग करत आहे. सध्या तरी पावसाचा जोर ओसरण्याचे चिन्ह दिसून येत नाही.