| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ मे २०२५
सांगली हे महाराष्ट्रातील एक बहुआयामी शहर असून, ते शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कृषी आणि क्रीडा क्षेत्रातील समृद्ध वारसा लाभलेले आहे. कृष्णा आणि वारणा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेली ही भूमी ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये मोलाचे योगदान देत आली आहे. स्वातंत्र्यलढ्यात सांगलीने दिलेला वाटा आजही प्रेरणादायी ठरतो.
जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या सांगलीत राज्य आणि जिल्हा पातळीवरील अनेक शासकीय, निमशासकीय संस्था कार्यरत आहेत. कृषी उत्पादनांच्या व्यापारात सांगलीचे महत्त्व वादातीत आहे. आशियातील सर्वात मोठ्या हळद बाजारपेठेमुळे या शहराला ‘हळदीचे शहर’ अशी ओळख मिळाली आहे. सांगलीच्या व्यापारी पट्ट्यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यांतीलही कृषी उत्पादने मोठ्या प्रमाणावर विक्रीस येतात.
सांगलीचे शैक्षणिक योगदानही विशेष आहे. इथे कला, वाणिज्य, विज्ञान, औषधनिर्माण, अभियांत्रिकी, वैद्यकीय, आयुर्वेद, विधी, पर्यावरण अशा विविध शाखांतील महाविद्यालये आणि संस्थांचा विस्तार आहे. नाट्यकलेच्या इतिहासातही सांगलीचे स्थान अग्रगण्य आहे. विष्णुदास भावे यांचे ‘सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक 1843 साली याच शहरात सादर झाले होते. त्यामुळे सांगलीला ‘नाट्यपंढरी’ असे सन्मानाने ओळखले जाते.
इतिहासाची पायाभरणी
पेशवाई काळापासून सांगलीच्या सामाजिक आणि प्रशासकीय बांधणीची घडी बसली. पटवर्धन संस्थानाने शिस्तबद्ध आणि शिक्षणाभिमुख समाज घडवला. राजारामबापू पाटील, वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, डॉ. पतंगराव कदम यांसारख्या थोर नेत्यांनी सहकार, शिक्षण आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे सांगलीला ‘सहकार नगरी’ ही ओळख मिळाली.
आजची सांगली : नव्याची कास
सध्याच्या घडीला सांगलीने शिक्षण, आरोग्य, साखर, हळद उद्योग, अन्न प्रक्रिया आणि व्यापार अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवला आहे. इथल्या द्राक्षांची निर्यात देशविदेशात होते. वैद्यकीय शिक्षणासाठीही सांगली महत्त्वाचे केंद्र बनले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सांगलीचा युवक स्टार्टअप्स आणि नवउद्योगांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत आहे.
उद्याची सांगली : अपेक्षा आणि आव्हाने
भविष्यातील सांगली अधिक विकसित व्हावी यासाठी राजकीय नेतृत्वाची ठाम इच्छाशक्ती गरजेची आहे. स्मार्ट सिटी योजना, हरित तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, पर्यावरणपूरक विकास, रोजगारनिर्मिती यामध्ये ठोस पावले उचलली गेली पाहिजेत. मात्र, पाणीटंचाई, बेरोजगारी, सार्वजनिक आरोग्य, अपुरी वाहतूक व्यवस्था, अपूर्ण पायाभूत सुविधा, बारगळलेली गटार योजना, आणि पर्यटन विकासातील दुर्लक्ष अशा अनेक समस्यांचा सामना सांगलीला करावा लागतो आहे.
सांगलीकरांना स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी वारणा योजना आणि चांदोली पाणीप्रकल्पाचा मार्ग सुटायला हवा. तरुण पिढीसमोरील बेरोजगारी हे मोठे आव्हान असून, त्यामुळे अनेकजण व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. यावर उपाय म्हणून नवीन उद्योग, आयटी पार्क, क्रीडा संकुले, सांस्कृतिक केंद्रे यांचा विकास होणे आवश्यक आहे.
सांगलीची वाटचाल – परंपरेपासून भविष्याकडे
सांगलीचा प्रवास हा पारंपरिक मूल्यांवर उभा असून, आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करणारा आहे. सामाजिक सहभाग, जागरूक तरुणाई, आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व मिळाले तर सांगली निश्चितच उज्वल भविष्यात प्रवेश करू शकते. कारण सांगली ही केवळ एक भौगोलिक जागा नसून ती एक वैचारिक चळवळ, संस्कृती आणि प्रगतीचा प्रतीक आहे.
लेख स्रोत : पल्लवी पाटील सांगली.